मुंबई : २०१८ साली बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री तनुश्री दत्ता दीर्घकाळानंतर भारतात परतली. याच दरम्यान एका मुलाखतीत तनुश्रीनं आपल्या शोषणाचा किस्सा सांगत #MeToo मोहिमेला भारतात जोरदारपणे हवा दिली होती. या आरोपामुळे #MeToo ची जोरदार चर्चा झाली. दडपलेल्या अनेक कहाण्या या निमित्तानं उघड झाल्या... अनेकांना त्याचे परिणामही भोगावे लागले. याच साखळीत तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत कायदेशीररित्या गुन्हाही दाखल केला होता. ही एफआयआर दाखल होऊन आता सात महिने उलटलेत. परंतु, पोलिसांना मात्र अद्याप कुणीही साक्षीदार मिळालेले नाहीत. अशावेळी गुरुवारी नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चीट देण्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. परंतु, तनुश्री दत्तानं मात्र नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाल्याच्या दावे खोटे असल्याचं सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, नाना पाटेकर यांच्या टीमकडून मुद्दाम अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. 'खरं हेच आहे की नाना पाटेकरांच्या टीमनं खोट्या बातम्या पसरवल्यात. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. नानांना क्लीन चीट दिल्याच्या बातम्या मीडियामध्ये पेरल्या जात आहेत. अद्याप मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही. माझे वकील नितीन सातपुते यांनी या गोष्टीची पडताळणी करून मला ही माहिती दिली आहे' असं तनुश्रीनं म्हटलंय. 


नानांची इमेज पूर्ववत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांना काम मिळणं बंद झाल्यानं नाना पाटेकर यांची पीआर टीम या खोट्या अफवा पसरवत असल्याचंही तनुश्रीनं म्हटलंय.



काय आहे प्रकरण


तनुश्री दत्तानं केलेल्या आरोपांनुसार, २००८ साली आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिला अचानक एक इंटीमेट सीन करण्यास सांगितलं आलं. परंतु, तिनं याला नकार दिल्यानंतर तिला हीन वागणूक देण्यात आली. या शुटींग दरम्यान नाना पाटेकर यांचा सहभाग नसतानाही त्यांनी गाण्यात त्यांच्यासहीत तनुश्रीचा एक इंटिमेट सीन करायचा होता. यानंतर तनुश्रीनं स्वत:ला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतलं होतं. 



या घटनेच्या १० वर्षानंतर तनुश्रीनं पाटेकर आणि गाण्याच्या कोरिओग्राफरविरुद्ध ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये लिखित स्वरुपात तक्रार दाखल केली होती. मीडियातील बातम्यांनुसार, नाना पाटेकर यांनी या प्रकऱणात पोलिसांनी क्लीन चीट दिलीय. परंतु, तनुश्रीनं मात्र हा दावा साफ फेटाळून लावत नानांना अद्याप क्लीन चीट मिळाली नसल्याचं सांगितलंय.