मुंबई : ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही भाईजान सलमानच्या 'भारत'ला दाद दिली जात आहे. या चित्रपटाचं वेड इतकं आहे, की भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनीही विश्वचषकातील व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत हा चित्रपट पाहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदार जाधव याने चित्रपट पाहिल्यानंतरचा एक फोटो पोस्ट केला. ज्यानंतर याविषयीची माहिती समोर आली. या फोटोमध्ये भारतीय संघातील खेळाडू दिसत आहेत. शिखर धवन, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन यांनी इंग्लंडमध्ये बॉलिवूडपटाचा आनंद घेतला. 


केदार जाधवने 'भारत की टीम, भारत मुव्ही देखने के बाद...' असं कॅप्शन देत हा फटो पोस्ट केला. ज्यानंतर खुद्द सलमाननेच भारतीय क्रिकेट संघाचे आभार मानले. सोबतच विश्वचषकातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. 'सारा भारत तुमच्यासोबत आहे', असं म्हणत त्यने #BharatJeetega असा हॅशटॅग जोडला. सलमान आणि केदारचा हा अंदाज पाहता कला आणि क्रीडा क्षेत्राचं मैत्रीपूर्ण नातं पुन्हा एकदा सर्वांसमोर आलं आहे. 



दरम्यान, अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी पहिल्याच दिवसापासून चांगला वेग पकडल्याचं पाहायला मिळालं होतं. सलमानशिवाय या चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ आणि मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे कलाकारही झळकले आहेत. मुख्य म्हणजे कलाकारांची ही फौज प्रेक्षकांची मनं जिंकण्यात चांगलीच यशस्वी ठरत आहे. तेव्हा आता येत्या काळात या चित्रपटाच्या कमाईचे आकडे किती उंची गाठतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.