`आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू`, निकालानंतर राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Tejaswini Pandit : विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. महायुतीला 288 पैकी 236 जागा मिळाल्या आहेत. ज्यामध्ये भाजपला 137 जागा मिळाल्या असून हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा नंबर आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. अशातच मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांना देखील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अमित ठाकरे यांनी माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागला.
तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट
विधानसभेच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक भाविनक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तेजस्विनीने राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तेजस्विनी पंडितने म्हटलं आहे की, विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला 100/100 पण तरीही...राज ठाकरे #एकनिष्ठ #सदैवसोबत. 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू' असं तेजस्विनी पंडितने तिच्या या पोस्टला कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच तिने या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचा एक फोटो देखील लावला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे यांच्या हातामध्ये दोन पुस्तके दिसत आहेत. ज्यामध्ये एका पुस्तकावर आम्ही काय केलं असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या पुस्तकावर आम्ही हे करू असं लिहिलं आहे.
निकालावर राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा एकही उमेदवार निवडणून आलेला नाही. अशातच राज ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अविश्वसनीय! तुर्तास इतकच.....राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.