`श्री गणेश` फेम अभिनेत्याचं निधन, मालिका विश्वात हळहळ
त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती
मुंबई : 'अमिता का अमित' आणि 'श्री गणेश' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आणि नावलौकिक मिळवलेल्या अभिनेता जगेश मुकाती यांचं बुधवारी निधन झालं. सूत्रांच्या माहितीनुसार जगेश यांना श्वसनाच्या त्रासामुळं मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथे त्यांना प्रकृती अधिक बिघल्यामुळं अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं.
मुकाती यांच्या निधनाचं मुख्य कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पण, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना चाचणीच्या अहवालात त्यांना या विषाणूचा संसर्ग न झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
...म्हणून ऊसतोड कामगारांना कोरोनाची लागण नाही
'तारक मेहता का उल्टा चष्मा', फेम अंबिका रंजनकरने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 'अतिशय प्रामाणिक, इतरांना मदत करणारे, आधार देणारे आणि तितकीच अफलातून विनोदबुद्धी असणारे जगेशजी... तुम्ही फार लवकर गेलात. देवाच्या कृपेनं तुमच्या आत्म्यास सद्गती लाभो. तुमची कायमच आठवण येत राहील', असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं.
तर, मराठमोळा अभिनेता अभिषेक भालेराव यानं ट्विट करत जगेश यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. आर्टिस्ट्स असोसिएशन CINTAA कडूनही जगेश यांच्या निधनाची एक पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.