मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसमुळं साऱ्या जगभरात असे काही परिणाम झाले आहेत, ज्यातून सावरण्यासाठीचं आव्हान अनेकांनाच चिंतेत टाकत आहे. या आव्हानांपैकीच एक म्हणजे आर्थिक चणचणीचं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागला तसतसं प्रत्येक देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यास सुरुवात झाली. पण, यासोबतच दैनंदिन जीवनाचं चक्रही काहीसं मंदावलं. कुणासाठी तर, हे चक्र ठप्प झालं. कलाविश्वात काम करणाऱ्या कलाकार मंडळींनाही याची झळ बसली. अभिनेता करण खंडेलवाल याचं नावही त्यापैकीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिद्धी विनायक', 'साथ निभाना साथिया' यांसारख्या मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या करण खंडेलवाल याला आर्थिक आव्हानं पाहता अखेर नाईलाजास्तव त्याच्या मुळ शहरात म्हणजे केरळात जावंल लागलं आहे. अत्यावश्यक आणि आर्थिक गरजा भागवण्यात अपयशी ठरल्यामुळं त्यानं हे पाऊल उचललं. 


टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, 'मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. त्याशिवाय मी राहत असणाऱ्या परिसरातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. हा प्रभाव इतका होता की, मला खाण्यापिण्यासोबत माझ्या काही गरजाही भागवता येणं अशक्य झालं होतं. शिवाय आर्थिक गणितंही बिघडली होती'.


आपल्यापुढं असणारी ही सर्व आव्हानं पाहता अखेर करणनं विमानाऐवजी रस्तेमार्गानंच केरळ गाठण्याचं ठरवलं. 'मी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत आहे. पण, सध्याच्या परिस्थितीला मला नाईलाजानं हे शरह सोडून कार चालवत केरळला जाण्याचं पाऊल उचलावं लागत आहे. घरी पोहोचण्यासाठी मी जवळपास १४०० किलोमीटरचा प्रवास केला', असं तो म्हणाला. 


 


मालिका विश्वात काम करत असतेवेळी मानधनाचे काही करार असतात. ज्यामध्ये चित्रीकरणानंतर मानधनाचा धनादेश मिळणं अपेक्षित असतं. त्यामुळं करणला एका वळणावर पैशांचीही चणचण जाणवू लागली. एका वेब सीरिजचं चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळं त्याचे पैसे त्याच्या हाताशी होते, त्यामुळं काहीशी मदत झाली. या काळात कुटुंबानं त्याला मदत केली. एकंदरत परिस्थितीचं गांभीर्य पाहता त्यानं या मायानगरीतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 
उराशी अनेक स्वप्न बाळगून कित्येक नवे चेहरे या शहरात येतात, स्थिरावतात, शहराला आपलंसं करतात. पण, कोरोनाच्या या महामारीमध्ये मात्र या शहराचाच श्वास गुदमरत असल्यामुळं स्वप्ननगरी मुंबईतून अनेकांनीच काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं.