अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट; `त्याने पेयामध्ये ड्रग्ज मिसळले आणि...`
तेव्हा तो काय म्हणत आहे हेच मला कळतच नव्हतं. पण....
मुंबई : प्रचंड लोकप्रियता, झगमगाट अशा अनेक कारणांसाठी कलाविश्वात पदार्पण करु पाहणाऱ्यांच्या मनात असंख्य स्वप्न असतात. पण, ही स्वप्न त्यांना अनेकदा या विश्वाचं दाहक वास्तवही दाखवून जातात. एका अतिशय लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीने नुकताच याविषयीचा गौप्यस्फोट केला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने कशा प्रकारे casting couch कास्टिंग काऊचचा सामना केला होता, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत दिला आहे.
गुंगी आणणारा काहीतरी पदार्थ अमुक एका व्यक्तीने आपल्या पेयात मिसळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बाब सांगणारी ही अभिनेत्री आहे रश्मी देसाई rashmi desai. मालिका विश्वासोबतच 'बिग बॉस' या रिऍलिटी शोमुळे चर्चेत असणाऱ्या रश्मीने 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी उघड केल्या.
१३ वर्षांपूर्वी तिने या कलाविश्वात पदार्पण केलं होतं. कुटुंबातून यापूर्वी कोणीही मालिका, चित्रपट वर्तुळाशी संलग्न नसल्यामुळे तिच्यासाठी हे पूर्ण विश्व अतिशय नवं होतं. इथली प्रत्येक व्यक्तीही तिच्यासाठी तितकीच नवी होती. किंबहुना तिची फार कोणाशी ओळखही नव्हती. पण, एका व्यक्तीचं नाव आणि तो व्यक्ती मात्र तिला आजही लक्षात आहे. अर्थात त्यामागचं कारणंही तितकंच गंभीर आहे.
सूरज नावाच्या या व्यक्तीने रश्मीला कास्टिंग काऊचला सामोरं गेल्याशिवाय या दुनियेत काम मिळणार नाही, असं सांगितलं होतं. त्याने पहिल्याच भेटीत रश्मीला तिच्या तयारीविषयी विचारलं. पण, तिला काही याचा अंदाज आला नाही. आपल्याला काहीच कळत नसल्याचं तिने सांगूनही त्याने तिला एका अर्थी बोलण्यात गुंतवून तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीच्याच काळात घडलेल्या या प्रसंगाविषयी सांगलाना रश्मी म्हणाली, 'एके दिवशी त्याने मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी अतिशय आनंदात होते. मी ज्या ठिकाणी पोहोचले तेथे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही नव्हतं. तिथे कॅमेराही नव्हता. त्याचवेळी त्याने माझ्या पेयामध्ये ड्रग्ज मिसळण्याचा प्रयत्न केला. त्याचा मनसुबा ठीक नव्हता. मीसुद्धा ते पेय पिण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारे त्याला हव्या त्या गोष्टी साध्य करायच्याच होत्या. जवळपास दोन अडीच तासांनी मी बाहेर आले. तेव्हा आईला झाल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. तेव्हा तिने त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली.'