The Accidental Prime Minister Movie Review : `संजय`च्या नजरेतून मनमोहन सिंग यांचे `महाभारत`
प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई :
दिग्दर्शक : विजय रत्नाकर गुट्टे
निर्माते : सुनील बोहरा, धवल गाडा
मुख्य भूमिका : अक्षय खन्ना, अनुपम खेर, सुझेन बर्नेट अर्जुन माथुर, आहाना कुम्रा
गेले काही दिवस ज्या सिनेमावरून देशभरात राजकारण करण्यात आले असा 'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या संजय बारू यांच्या 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर - मेकिंग अँड अनमेकींग ऑफ डॉ. मनमोहन सिंग' पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस या पुस्तकाची विक्रीचं होत नव्हती. त्यानंतर तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पीएमो ऑफिसमधून या पुस्तकाबद्दल भाष्य करण्यात आले. 'या पुस्तकातील तथ्य चुकीची असून संजय बारु यांनी पंतप्रधानांच्या विश्वासाचा फायदा उठवला, आम्ही त्यामागचे सत्य लवकरच जगासमोर आणू' असे पीएमओ ऑफिसमधून सांगण्यात आले. यानंतर या पुस्तकाच्या विक्रीने जोर धरला होता. त्यानंतर देशभरात या पुस्तकाची चांगलीच चर्चा झाली. सिनेमाच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने असंच काहीस चित्र पाहायला मिळतंय. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोपात अभिनेते अनूपम खेर आणि इतर 14 जणांविरुद्ध तक्रार दाखल करणे, प्रदर्शनापूर्वी सिनेमा दाखवण्याची मागणी कॉंग्रेसतर्फे करणे अशा साऱ्या घटनांमुळे सिनेमाची चर्चा तर होणारच होती. यातील कथा पुस्तकाच्या माध्यमातून आधीच समोर आली होती. आता फक्त दिग्दर्शकाच्या नजरेतून ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
2004 मध्ये कॉंग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी दृढ इच्छा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची होती. पण सोनिया गांधी डॉ.मनमोहन सिंग यांचे नाव सुचवतात. सुझेन बर्नेट यांनी सोनिया गांधीची व्यक्तिरेखा साकारली आहे. इथेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत असलेल्या अनुपम खेर यांची भूमिका सुरू होते. पंतप्रधान झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या विश्वासातील संजय बारू यांना स्वत:चा माध्यम सल्लागार म्हणून नेमतात. 'महाभारतामाध्ये राजा धृतराष्ट्राला संजयने महाभारत सांगितले त्याप्रमाणे तू माझे डोळे, कान होशील का ?' अशी विचारणा डॉ. मनमोहन सिंग (अनुपम खेर) हे संजय बारू (अक्षय खन्ना) यांना करतात. इथपासून संजयच्या नजरेतील डॉ. मनमोहन सिंग यांच्या 'महाभारता'ला सुरूवात होते.
संजय बारू (अक्षय खन्ना) सुत्रधार म्हणून कथा सांगायला सुरूवात करतात. संजय बारू भूमिकेवरची अक्षय खन्नाची पकड मिनिटा मिनिटाला मजबूत होताना दिसते. अनेक निर्णयात संजय बारू हेच पंतप्रधानांपेक्षा प्रभावी दिसतात. पंतप्रधानांनी स्वत:च्या ईमेजकडे लक्ष द्यावे यासाठी संजय बारु सुरूवातीपासूनच आग्रही असतात. पण पंतप्रधान पद, देशासमोरचे बदलते प्रश्न, पक्षांतर्गत राजकारण या सर्वांचा विचार करता पक्षाला प्राधान्य देणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वत:च्या ईमेजकडे लक्ष दिले नाही. हेच संजय बारू यांना खटकत असे. आणि तेच त्यांनी आपल्या पुस्तकातूनही उतरवले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळातील अनेक घटना, निर्णय आणि त्याभोवती असणारे कॉंग्रेस नेते सिनेमातून संजय बारु यांनी समोर आणले आहेत.
देशातील महत्त्वाच्या निर्णयात गांधी परिवार आणि काही निवडक मंडळीचा हस्तक्षेप असतो. देशाची सरकार तेच चालवतात, हे पटवून देण्यासाठी संजय बारूंनी काही घटनांचा उल्लेख केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात यशाचे श्रेय राहुल गांधी यांना आणि अपयशाचे खापर डॉ. सिंह यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न, हे सर्व माहित असतानाही डॉ. सिंग यांनी कोणती ठोस भूमिका न घेणं आणि या सर्वावर माध्यम सल्लागार म्हणून संजय बारू यांना त्यावेळी काय दिसलं हा घटनाक्रम सिनेमातून समोर येतो. यातून गांधी परिवारावर निशाणा साधण्यात आलाय आणि सिनेमा पाहणाऱ्यांना डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल सहानभूती वाटत राहते.
अक्षय खन्ना आणि अनुपम खेर तगड्या भूमिकेने संपूर्ण सिनेमा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. अनूपम खेर यांच्या पेहराव, त्यांच्या चालण्या बोलण्याची लकब तंतोतंत पकडण्याचा अनुपम खेर यांनी यशस्वी प्रयत्न केलाय. या सिनेमाचे कथानक हा वादग्रस्त मुद्दा असला तरी अक्षय खन्ना आणि अनुपम खेर यांनी वठवलेली भूमिका वेगळी ठरते. सिनेमाचे भविष्य येत्या काही दिवसात कळेलच पण अक्षय खन्नाच्या कारकीर्दीसाठी हा सिनेमा माईल्ड स्टोन ठरेल एवढं मात्र नक्की.
सुझेन बर्नेट या सोनिया गांधी, अहाना कुर्मा प्रियांका गांधी, अर्जून माथूर राहुल गांधी यांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या डायलॉग्सपासून चेहऱ्यातील बारकाव्यांमध्ये दिग्दर्शक विजय गुट्टेंचा प्रभाव दिसत राहतो. सिनेमातील 'ये लोग आपको लाईबिलीटी बनाना चाहते है पर मै आपको असेट बनाऊंगा सर' अशा आशयाचा आणि असे अनेक अक्षय खन्नाचे डायलॉग प्रेक्षकांचा लक्षात राहतात.