मुंबई : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर आधारलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं शीर्षक 'राजा येईल गं' असं आहे. परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत एक अनमोल संदेशही पोहोचवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरीसमा २४ सिने या बॅनरखाली 'राजा येईल गं' या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून थ्री डॅाट्स स्टुडिओजचे आनंद तांबोळी, नेहा टकले, खिंजल फिल्म्सचे चंद्र मोहन दीक्षित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'राजा येईल गं' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रविसुमन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 'राजा येईल गं' ही कथा आहे स्त्रीजन्माची... एका आईची... दोन मैत्रीणींची... स्त्रीने सोसलेल्या दु:खाची... तिच्या प्रेरणादायी संघर्षाची... नाट्यमय वळणं असलेली ही कथा एकीकडे नात्यांची गोष्ट सांगणार आहे, तर दुसरीकडे समाजातील ज्वलंत मुद्द्यांवरही प्रकाश टाकणार आहे. 


सुमधूर गीत-संगीताच्या जोडीनं हा प्रवास संगीतमय करण्याचा दिग्दर्शक रविसुमन यांचा प्रयत्न राहणार आहे. या चित्रपटाबाबत रविसुमन म्हणाले की, या चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना विविध छटा दिसतील. चित्रपट पाहताना कुठे ना कुठे त्यांना आपलं प्रतिबिंब पडद्यावर पाहायला मिळेल. एक सुरेख गोष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण संदेशही जनमानसापर्यंत पोहोचवणार आहे. घोषणेनंतर लगेचच या चित्रपटाची पुढील कामे वेगात सुरू करण्यात येणार असून कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचंही रविसुमन यांनी सांगितलं.


'राजा येईल गं' या चित्रपटात रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत कोणकोणते कलाकार दिसणार हे लवकरच समजणार आहे. मूळ कथा नेहा टकले यांची असून रविसुमन यांनीच सहनिर्मात्या नेहा टकले यांच्या साथीने चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन रविसुमन यांनीच केले आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच रविसुमन यांनी निलेश गमरे यांच्या साथीने गीतलेखन केलं असून, ही गीते संगीतकार विशाल बोरुळकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. प्रग्नेश दवे व निलेश गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.