`झिम्मा 2`ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्ही पाहिला का धमाल टीझर?
या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ``यावेळेला खूपच व्हरायटी आहे.`` आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत.
मुंबई : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे.
या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ''यावेळेला खूपच व्हरायटी आहे.'' आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता 'झिम्मा २' मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते!
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील भन्नाट वाटत आहेत.
'झिम्मा' मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव 'झिम्मा'ने करून दिली. हेच 'स्वत्त्व' शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.
याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' चित्रपटाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कारांवर चित्रपटाने मोहोर उमटवली. 'झिम्मा' पाहून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला 'झिम्मा २' यावा, अशी मागणीही केली. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्ही 'झिम्मा २' साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही 'रियुनियन' दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्की!' बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे 'रियुनियन' किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘झिम्मा २' च्या प्रदर्शनाची