मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार `गुलकंद`, या दिवशी होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटाचे नाव आणि चित्रपटामधील भन्नाट पात्र हे नेहमी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत असतात. असाच एक चित्रपट मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येत आहे. जाणून घ्या सविस्तर
Gulkand : एवरेस्टेंट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित 'गुलकंद' हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.'गुलकंद' या चित्रपटाचे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत. चित्रपटाचे नाव, भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटाबद्दल सचिन गोस्वामी काय म्हणाले?
'गुलकंद' चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाबद्दल म्हणाले की, मी या सगळ्यांसोबत आधी काम केलं असल्याने आमच्यात एक चांगली बॅाण्डिंग आहे. आमची हिच केमिस्ट्री या चित्रपटात देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.
कॉमेडी चित्रपट
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, या चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला आवडली होती. मुळात ही एक मुरलेली टीम आहे. त्यामुळे या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील खूपच कमाल होता. आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलकेफुलके विषय पाहायला खूप आवडतात. हा चित्रपट ज्यावेळी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. तेव्हा हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतमुखाने थिएटरबाहेर पडतील. आपल्या प्रियजनांसोबतच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे. असं या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी म्हटलं आहे.