मुंबई : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तूत, चलचित्र मंडळी निर्मित आगामी मराठी चित्रपट झिम्मा २ चे मोठया जोमाने प्रमोशन सुरु झाले असल्याचे दिसुन येत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होत असल्याची घोषणा करताच सोशल  मीडियावर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती, चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यात भर म्हणजे आज दसऱ्याच्या शुभ दिवशी चित्रपटाचा पहिलं पोस्टर आउट करण्यात आला आहे, ज्यात चित्रपटातले सर्व कलाकार दिसत आहेत! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरहिट चित्रपट झिम्मा नंतर आता पुनः नव्या पोस्टर मधून आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांचा धम्माल लूक बघून प्रेक्षक मोठया पडद्यावर या सगळ्यांना भेटण्यास आतुर झाले आहेत. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांच्या बरोबरीने आणखी दोन प्रसिध्द चेहरे ह्या तगड्या कलाकारांच्या टोळीमध्ये सामील झाले आहेत.ते म्हणजे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे. पण या दोघींची पात्रं काय आहेत आणि ती या कथेत काय रंग भरणार यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याचबरोबर समोर आलेल्या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले दिसत नाहीये त्यामुळे या सिनेमात तुम्ही या दोघींना मिस करणार आहात.


बॉक्स ऑफिस वर यशस्वी छाप पाडत झिम्मा ने प्रेक्षकांच्या मनात घर तर केले आहे  परंतु त्याच बरोबर मायबाप प्रेक्षकांची मागणी बघता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांना ह्याच चित्रपटाचा सिक्वेल आणण्यास ही प्रवूत्त केले आहे. आज झिम्मा2 साठी प्रेक्षकांची उत्सुकता बघता हेमंत ढोमे म्हणाले कि, “पहिल्या भागाला लोकप्रियता मिळाली म्हणून दुसरा भाग करूया असं कधीच ठरलं नव्हतं. पहिल्या भागाची कथा पुढे नेताना रियूनियन ची मजा सापडली आणि हा चित्रपट करायचं ठरलं! लोकांनी कथेवर, त्यातल्या पात्रांवर भरभरून प्रेम केलं त्यामुळे या पात्रांना पुन्हा तितक्याच सहजतेने सादर करण्याची जबाबदारी होती. पण माझ्या संपुर्ण टिमने झिम्मा २ मजा घेत आणि आपलेपणाने बनवला आहे, मला खात्री आहे आमचा हा आपलेपणा, साधेपणा प्रेक्षकांनाही आपलंसं करेल.”



कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित "झिम्मा2" पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहांत दाखल होत आहे.