मुंबई : स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण. दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. 
 
महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य सिनेमा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, तसेच चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते. या मंगल समयी कलाकारांच्या हस्ते धार्मिक विधीने श्रीराम पूजा आणि हवनही करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " चित्रपटाचे पोस्टर अनावरण हे केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणार नाही तर या महत्वाच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्वही आत्मसात करणार आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'चा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' यांच्या शौर्याला मानवंदना आहे. हा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांसाठी लवकरच घेऊन येत आहोत. आमचा हा प्रयत्न इतिहास रसिकांना तसेच प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा करतो." 



गोल्डन रेशियो फिल्म्स, किंग्जमेन प्रॉडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब, सौम्या मोहंती विळेकर, समीर अरोरा सहनिर्माते आहेत.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णी मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या भूमिका साकारणार आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून येत्या २२ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.