`आधी पैसे पाठवले आणि नंतर...`; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
छोट्या पडद्यावरील `आई कुठे काय करते` या लोकप्रिय मालिकेची ती लेखिका आहे. तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Mugdha Godbole Fraud : गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांसोबत ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिकेबरोबर अशाचप्रकारची घटना घडली आहे. पण सुदैवाने यात त्या अभिनेत्रीचे आर्थिक नुकसान झालेले नाही. पण तिने घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेची लेखिका म्हणून मुग्धा गोडबोले-रानडेला ओळखले जाते. मुग्धाने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यासोबतच तिने तिच्याबरोबर झालेला फसवणुकीच्या प्रकाराबद्दल सांगितले आहे.
मुग्धा गोडबोलेसोबत नेमकं काय घडलं?
"5 फेब्रुवारीला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉड चा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अश्यात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंटवर परत जमा करावेत. 12,500 रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं. पुढे त्याने आधी 10,000 रुपये transfer केल्याचा मेसेज आला आणि मग 25000 रुपये पाठवल्याचा मेसेज आला. त्याच वेळी माझ्या gpay अकाऊंटवरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की मी चुकून 2,500 चया ऐवजी 25,000 ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा.
मधल्या काळात मी नवऱ्याशी सम्पर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे ह्या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंट चा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे.
माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू ह्याचाही कदाचित अंदाज होता. डोळे कान आणि मेंदू 24 तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही", असे आवाहन मुग्धा गोडबोलेने केले आहे.
दरम्यान मुग्धा छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आणि लेखिका आहे. तिने ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी लेखिका म्हणून काम केले आहे. त्या त्यांच्या उत्तम लिखाणासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.