Famous Actress Turned Beggar: चित्रपटसृष्टीमधील लोकप्रियता आणि आकर्षित करणारा पैसा सर्वांनाच संभाळता येतो असं नाही. रोज हजारोंच्या संख्येनं मायनगरी मुंबईमध्ये तरुण-तरुणी कलाकार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. मात्र यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यांनाच या झगमगत्या दुनियेकडून स्वीकारलं जातं. मात्र या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करुनही अपयश आलेल्यांना हे अपयश पचवता येत नाही आणि ते स्वत:चं आयुष्य उद्धवस्त करुन घेतात. अशीच एक अभिनेत्री आहे मिताली शर्मा. एकेकाळी निर्मात्यांची पहिली पसंत असलेल्या या अभिनेत्रीवर अगदी भीक मागण्याची वेळ आली. जिवंत राहण्यासाठी या अभिनेत्रीला चोरीही करावी लागली होती. याच अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिताली शर्मा ही एक भोजपूरी अभिनेत्री आहे. तिचे सुरुवातीचे चित्रपट जबरदस्त हीट ठरले. या चित्रपटांनी तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली. मितालीला अल्पावधीत मिळलेल्या या यशामुळे भोजपुरीमधील सर्वच निर्माते आणि दिग्दर्शक इतर कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा तिलाच अधिक प्राधान्य देत होते. मात्र नंतर मितालीच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यामुळे हळूहळू सर्वांनी तिच्यापासून दूर जाण्यास सुरुवात केली. जे निर्माते आणि दिग्दर्शक तिच्या घराबाहेर रांग लावून उभे असायचे तेच तिला टाळू लागले. एक वेळ अशी आली की तिला काम मिळणं बंद झालं. तिला अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि त्यानंतर करिअरला लागलेली उतरती कळा सहन झाली नाही. 


भीक मागू लागली, पोलिसांना शिवीगाळ


आधीच काम मिळत नसल्याने आर्थिक स्थिती दिवसोंदिवस बिघडत जात असतानाच मितालीची मानसिक स्थितीही बिघडत गेली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मिताली शर्मा मुंबईमधील लोखडंवाला येथे भीक मागू लागली. अगदी मितालीला रस्त्यावर चोरी करताना पकडण्यात आल्याच्या बातम्याही पेज थ्रीवर चर्चेत होत्या. मितालीला महिला पोलीस कर्मचाऱ्याने अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने या पोलीस कर्मचाऱ्याला शिवी घातली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. 


घरच्यांविरुद्ध बंड अन् वेडेपणा


मिताली शर्मा मूळची दिल्लीची आहे. तिने करिअरच्या सुरुवातीला मॉडेल म्हणूनही काम केलं आहे. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याने ती दिल्लीतील घर आणि मॉडेलिंगमधील करिअर सोडून मुंबईला पळून आली. तिच्या या बंडखोर वागण्यामुळे कुटुंबाने तिच्याबरोबरचं नातं तोडलं. मुंबईत आल्यानंतर काही निवडक चित्रपट आणि मॉडलिंगचे काही असाइन्मेंट मिळाल्यानंतर तिला कामं मिळवण्यात सातत्य राखता आलं नाही. एक काळ असा आला की तिला कोणी काम देण्यास तयार नव्हतं. कामं मिळत नसल्याने तिला आर्थिक चणचण जाणवू लागली. या परिस्थितीला एकटीने तोंड देत असल्याने तिच्या मानसिक परिस्थितीवरही वाईट परिणाम झाला. पोलिसांनी तिला अटक करुन पोलीस स्टेशनला नेलं तेव्हा तिथे गेल्यावर मितालीने सर्वात आधी मला खायला द्या अशी मागणी पोलिसांकडे केल्याचं सांगितलं जातं. 


वेड्यांच्या विभागात केलं दाखल


काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मितालीला पोलीस स्टेशनमधील वेड्यांच्या विभागामध्ये दाखल करण्यात आल्याचं समजतं. आज तिची परिस्थिती कशी आहे? ती काय करते याची माहिती उपलब्ध नाही.