मुंबई : लग्न म्हटलं की आयुष्यातील एक खास दिवस. या दिवशी मनात होणारी धाकधुक, मित्रमैत्रीणींचा कल्ला, या साऱ्या वातारणात एका व्यक्तीचीही लगबग सुरु असते. लग्नसोहळ्यात कोण काय करत आहे हेच टीपण्यासाठी या व्यक्तीची लगबग सुरु असते. काही लक्षात येतंय का की ही व्यक्ती आहे तरी कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लगीनसराईमध्ये लगबग असणारी ती व्यक्ती म्हणजे कॅमेरा हातात घेऊन हे खास क्षण टीपणारा फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर. गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या दिवसांची खास आठवण म्हणून एखादा सुरेख व्हिडिओ तयार करण्याला सर्वांचंच प्राधान्य असल्याचं पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. 


सेलिब्रिटींच्या या यादीतील काही नावं म्हणजे, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, विराट कोहली- अनुष्का शर्मा, बिपाशा बासू- करण सिंग ग्रोवर आणि इतर. ज्या विवाहसोहळ्याची कोणाला कानोकान माहिती नव्हती, अशा विराट आणि अनुष्काच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण टीपले होते, विशाल पंजाबी आणि त्याच्या संपूर्ण टीमने. 'द क्विंट'ने विशालचा हा प्रवास उलगडला आहे. 


बॉलिवूडमध्ये सुरुवातीचा काही काळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या विशालने आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून एक असं कलात्मक काम सुरु केलं, ज्या माध्यमातून सर्वांनाच आयुष्यभरासाठीच्या काही खास आठवणींचा ठेवा दिला. स्वत:च्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओही विशालने स्वत:च काही मित्रांच्या सहाय्याने साकारला होता. ज्यानंतर त्याने मित्रपरिवारातील एकाला लग्नातील भेट म्हणून त्यांच्याच लग्नातील खास क्षणांचं चित्रीकरण करुन दिलं आणि बस्स.... वेडिंग फिल्मच्या या स्वप्नवत प्रवासाला सुरुवात झाली. 



अवघ्या चार व्यक्तींनी सुरु केलेला 'द वेडिंग फिल्मर' या विशालच्या टीममध्ये आज एकूण ६० जणांचा सहभाग आहे. यामध्ये सिनेमॅटोग्राफरपासून संगीत दिग्दर्शकांपर्यंतची टीम आहे. विविध ठिकाणी त्यांच्या या टीमकडून लग्नसोहळ्यांचं चित्रीकरण केलं जातं. टीममधील सदस्याची उपलब्धता, अमुक एका ठिकाणी कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असणारी भाषा या सर्व गोष्टी लक्षात घेत विशाल  आणि त्याची संपूर्ण टीम हे कलात्मक काम करत असते. 



एखादं लग्न चित्रीत करण्यासाठी कमीत कमी एका सदस्यापासून जास्तीत जास्त ३५ सदस्यांपर्यंतची टीम अशी काही कमाल करुन जाते, ज्याचा प्रत्यय त्यांच्याकडून सादर करण्यात येणाऱ्या व्हिडिओतूनच येतो. विशालचा या क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि मुख्य म्हणजे असंख्यजणांच्या चेहऱ्यावर हसू आणत त्यांच्या भावना टीपण्याची त्याची ही कला खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे हेच खरं. 


फक्त खऱ्या आयुष्यातील विवाहसोहळेच नव्हे. तर, 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील विवाहसोहळ्याच्या वेळच्या दिग्दर्शनासाठीसुद्धा विशालची अयान मुखर्जीला मदत झाली होती. त्यामुळे पडद्यावर आणि पडद्यामागे घडणाऱ्या असंख्य घडामोडींना एका कलात्मक धाग्यात गुंफत त्याची शोभिवंत माळ करणाऱ्या विशालची प्रशंसा करावी तितकी कमीच, असं म्हणायला हरकत नाही.