...म्हणून #Suriya37Title ट्विटर ट्रेंडमध्ये
जाणून घ्या त्यामागची रंजक कारणं...
मुंबई : सोशल मीडियावर अनेक गोष्टी एका क्षणातल ट्रेंडमध्ये येतात. मुळात त्या ट्रेंडमध्ये का आल्या आहेत, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतो. सध्याच्या घडीला असाच एक हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे. तो हॅशटॅग म्हणजे #Suriya37Title.
३१ डिसेंबर २०१८ म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी अचानकच हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येण्याचं कारणही तसंच आहे. दिग्दर्शक के. व्ही. आनंद आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाचं अनावरण लवकरच करण्यात येणार असल्याचं कळत आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दिग्दर्शक के. व्ही. आनंद यांनी ट्विट करत चाहत्यांनाच या चित्रपटाच्या नावाची निवड करण्याची मुभा दिली होती. तेव्हापासूनच चित्रपटाच्या नावाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. अखेर ही प्रतिक्षा आता संपणार असून, नव्या वर्षाच्या पदार्पणातच यावरुन पडदा उचलण्यात येणार आहे.
साहस आणि थरार यांची सांगड घालून साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटामध्ये सुर्याशिवाय मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता मोहनलाल, सय्येशा, आर्या, बोमन इरानी आणि समुथीरकणी असे प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
सध्या या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचीही बरीच चर्चा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हातात रिव्हॉल्वर घेऊन दिसत आहे. पोस्टरच्या एका बाजूला लिहिलेल्या ओळीही अनेकांचच लक्ष वेधत आहेत. 'तुमचा जीव वाचवणारा हा कोणाचातरी मारेकरी असू शकतो...', अशा आशयाच्या या ओळी पाहता आता या चित्रपटाचं नाव नेमकं काय असणार याविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. पण, तुर्तास या ट्रेंडच्या प्रवाहात वाहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नाही. कारण, ठरलेल्या वेळीच या रहस्याचा उलगडा होणार आहे.