मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर असंकाही अधिराज्य गाजवलं आहे जे पाहता हा चित्रपट खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे असंच म्हणावं लागेल. सध्या या चित्रपटासोबतच गाजतोय तो म्हणजे या चित्रपटातील एक संवाद.   त्या संवादाविषयी फार काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण तुम्हीही त्याचा वापर गेल्या काही दिवसांमध्ये केलाच असेल. तो  संवाद किंवा प्रश्न म्हणजे ‘How’s the Josh?’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैन्यदल अधिकाऱ्याच्या रुपात अभिनेता विकी कौशल ज्यावेळी ‘How’s the Josh?’ असं विचारतो तेव्हा 'High sir', असं म्हणत फक्त पडद्यावरील कलाकारच नव्हे तर प्रेक्षकही उत्तरतात आणि उरीची लोकप्रियता लक्षात येते. 


दिग्दर्शक आदित्य धरने 'पीटीआय'शी संवाद साधतानाच याविषयीची माहिती देत नेमका हा संवाद चित्रपटात का आणि कशा पद्धतीने वापरात आणला यामागची रंजक गोष्ट सांगितली आहे. 


'माझे बरेच मित्र हे सैन्यदलात काम करणाऱ्या कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांच्यासोबत नेहमीच आर्मी क्लबमध्ये माझं जाणं येणं व्हायचं. अशाच दिल्लीतील एका क्लबमध्ये आम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जायचो. तेव्हा तिथे एक सेवानिवृत्त अधिकारी हातात चॉकलेट घेऊन येत आणि लहान मुलांना एका रांगेत उभं करत असत', ही आठवण त्याने सांगितली. 


ते सेवानिवृत्त अधिकारी  'How's the josh?'  असं विचारताच क्लबमध्ये असणारे आम्ही सर्वजण  'High Sir', असं म्हणत असू असं सांगत तिथून ही ओळ आपल्या मनात अशी काही घर करुन गेली ती आज अशा पद्धतीने वापरात आणली, असं त्याने स्पष्ट केलं. 


सैन्यदलातील बरेच अधिकारी ही ओळ अनेकदा वापरतात हे खरं. पण, आदित्यनेही ही ओळ आपल्या चित्रपटा अगदी सुरेपणे वापरली आणि ती लोकप्रियतेच्या शिखरही पोहोचली. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या उरी... या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा असणाऱ्या या संवादामागची ही कथा आहे की नाही रंजक?