मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि चित्रपट निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवतेवेळी तिने काही गोष्टी उघड करत दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी कशा प्रकारे आपल्याशी जवळीक साधत चुकीच्या पद्धतीने आपल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता हे तिने या तक्रारीत म्हटलं आहे. 


गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी आपण कोणत्याही चुकीच्या किंवा अश्लील दृश्यासाठी परवानगी दिली नसल्याचा खुलासाही तिने केला. पण, तरीही त्यावेळी नाना पाटेकर यांनी गाण्याच्या चित्रीकरणावेळी सोबत असणाऱ्या कलाकारांना (डान्सर्सना, ज्युनिअर आर्टिस्टना) मागे जाण्यास सांगितलं आणि ते मला कसं नाचायचं हे शिकवू लागले असंही ती म्हणाली. 


'गाण्यात नानांचा जो भाग होता त्यात ते एकटेच पडद्यावर दिसणं अपेक्षित होतं. त्यासोबतच त्यांचं चित्रीकरणही ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजे २३ मार्च २००८ रोजी होणं अपेक्षित होतं. 


हा सर्व प्रकार मी निर्माते आणि दिग्दर्शकांच्या कानांवर घातला ज्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घालू असं आश्वासन मला दिलं. जवळपास तासाभरानंतर मला पुन्हा सेटवर बोलवण्यात आलं. ज्यानंतर गणेश आचार्य यांनी गाण्यात अशा काही स्टेप नव्याने जोडल्या आहेत ज्यामध्ये नानंचाही सहभाग असल्याचं मला सांगण्यात आलं. इच्छा नसतानाही त्या स्टेपनुसारच परफॉर्म करण्यास मला निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सांगण्यात आलं. मुळात हे सर्व संभाषण सुरु असतेवेळी नानाही सेटवर उपस्थित होते', असंही ती या पत्रकात म्हणाली आहे. 


सेटवर झालेल्या या वादानंतर तनुश्रीने आपल्याला भीती दाखवण्यासाठी म्हणtन मनसे या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आल्याचं सांगत लोकं आपल्या कारवर धावून येत होते, कारमधून आपल्याला बाहेर काढण्याटची धमकी देत होते, असंही सांगितलं. 


झाल्या प्रकरानंतर फिल्मिस्तान स्टुडिओनजीक असणाऱ्या गोरेगाव पोलीस ठाण्यात नेत एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. माझ्या सांगण्यानुसार ती एफायआर नोंदवण्यात आली नव्हती. शिवाय त्यावर कोणतीही कारवाईही करण्यात आलेली नव्हती. त्याशिवाय त्यावेळी दाखल करण्यात आलेली तक्रार ही मराठीत असल्यामुळे आपल्याला त्यातील फार काही कळलं नसल्याचं स्पष्ट करत तक्रारीतून बराच मुख्य भाग वगळण्यात आल्याचंही तिने सांगितलं. एफआयारमध्ये फक्त कारची तोडफोड झाल्याचाच उल्लेख करण्यात आला असून मुख्य दोषींचा उल्लेखही त्यात करण्यात आला नव्हता. 


सेटवर घडलेल्या या सर्व प्रकरामुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचं म्हणत तनुश्रीने त्या क्षणापासून आपल्याला धमक्या येत असल्याचं आणि चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात येण्याची भीती दाखवण्यात येत असल्याचं सांगत आता भारतीय दंडसंविधानाच्या कलम ३५४, ३५४ (A), कलम ३४, कलम ५०९ अंतर्गत नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग आणि सेटवर त्या क्षणी उपस्थित राहून तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आता पुढे मिळणारं वळण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.