`हे` मराठी सेलिब्रिटी कपल असा साजरा करणार `व्हॅलेंटाईन डे`
सध्या व्हेलंटाईन आठवडा सुरु आहे. मग यामध्ये आपले सेलिब्रिटी कपल कसे मागे असतील. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी त्यांच्या व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहेत याबद्दल सांगणार आहोत.
मुंबई : अक्षरा आणि नेत्राच्या अभिनयाच्या प्रेमात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. अक्षरा-अधिपती आणि नेत्रा-अद्वैतची जोडी मालिकांमध्ये गाजतेय. ह्या जोड्यांचं प्रेम तर तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहतच असाल पण आज 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षराची भूमिका साकारणारी शिवानी रांगोळे आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये नेत्राची भूमिका साकारत असलेली तितिक्षा तावडे आज आपल्या प्रेमाच्या व्यक्तीं विषयी बोलत आहेत आणि आपले व्हॅलेंटाईन डेचे प्लॅन्स ही शेयर करत आहेत.
शिवानी रांगोळने सांगितले की ''माझ्या जीवनातली ती खास व्यक्ती सर्वांनाच माहिती आहे तो विराजस आहे. आमच्या मध्ये पती-पत्नीच्या नात्याआधी आमची मैत्री आहे ज्यामुळे नात्यांमध्ये एक वेगळाच ताजेपणा आहे आणि आसपास शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचा आमचा प्रयत्न असतो . आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकाला आवडणाऱ्या गोष्टी करतो. आमचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन असा आहे की दोघांना ही घरच खाण्याची आवड आहे तर काही तरी घरीच बनवून खायला आम्हाला दोघांना आवडेल आणि एखादी छान फिल्म किंवा सिरीज बघू. विराजसला मला ह्या माध्यमातून सांगायचंय आहे की तू नवरा होण्याआधी माझा मित्र आहेस आणि याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. १०-१२ वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो आणि आपण एकमेकांची प्रगती होतांना पहिली आहे आणि प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहेस तर जसा आहे तसाच राहा कधी ही बदलू नकोस.''
तितिक्षा तावडे म्हणते, " प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. ज्याव्यक्तींवर माझं प्रेम आहे त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. माझ्या त्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ बोडके ला एक निरोप देईन की प्रेम काय आहे हे कोणी अजून डिकोड नाही केलंय तर आपण दोघे मिळून ते डिकोड करण्याचा प्रयत्न करू, थोडं तू चूक, थोडं मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊ आणि भरभरून प्रेम करायला शिकू. १४ फेब्रुवारीला 'सातव्या मुलीची सातव्या मुलगीच' शूटिंग करत असणार पण त्या नंतर जो काही थोडा वेळ मिळणार आहे तो मी सिद्धार्थ बरोबर घालवणार आहे'