करण ओबेरॉयवर लैंगिक अत्याचारांचे आरोप करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात
जाणून घ्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण
मुंबई : मुंबई पोलिसांनी सोमवारी टेलिव्हिजन अभिनेता आणि गायक करण ओबेरॉयवर बलात्कार आणि ब्लॅकमेल करण्याचे आरोप लावलेल्या महिलेला अटक केले आहे. एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितानुसार करण ओबेरॉयला कथित रित्या महिलेवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी ६ मे रोजी अटक करण्यात आले होते. पण आता करण ओबेरॉयला मुंबई उच्च न्यायालयाने ७ जून रोजी जामीन मंजूर केला आहे.
पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी महिलेस अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. करणवर कथित रित्या खोटे आरोप दाखल करत, आणि स्वत:वर हल्ला करण्याचा कट रचल्या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी महिलेस अटक केले आहे.
महिलेच्या आरोपांनुसार, २५ मे रोजी दोन दुचाकीस्वारांनी महिलेवर हल्ला केला होता. त्याचबरोबर करणवर करण्यात आलेले आरोप मागे घेण्यासाठी एक चिठ्ठी महिलेस दिली होती, त्यामध्ये ऑसिड हल्ला करण्याची धमकी महिलेस देण्यात आली होती. पण काही दिवसांनंतर पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
संबंधित प्रकरणातील एक आरोपी हा महिलेच्या वकिलाचा नातेवाईक असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींनी हल्ला पूर्व नियोजित असल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना या कामासाठी १० हजार रूपये दिल्याचे समोर येत आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तसेच त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हिडिओ दाखवून तो प्रसिद्ध करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही महिलेकडून लावण्यात आला होता.