प्रेमाला आता कायद्याची गरज नाही; कारण `377 अब Normal`
सोशल मीडियावर चर्चा `377....`चीच
मुंबई : प्रेमाच्या नात्याची परिभाषा कायदा मांडणार ही बाब अनेकांना पटणारी नाही. किंबहुना प्रेमाची ही भावना आणि त्यात असणारा भाव हा कायद्याच्या साचेबद्ध भाषेतून मांडताच येऊ शकत नाही हे सांगणारा झी 5 च्या ओरिजिनल्सच्या यादीत येणारा '377 अब Normal' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर आणि अनेक स्तरांमध्ये दाद मिळवत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचं साऱ्या देशातून स्वागत करण्यात आलं.
जगातील विविध ठिकाणी असणाऱ्या एलजीबीटी समुदायासाठी काम पाहणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. पण, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा हा लढा तितका सोपा नव्हता. हा दिवस पाहण्यासाठी अनेक अडथळे, विरोधांचा सामना एलजीबीटी समुदायाला आणि याचिका कर्त्यांना करावा लागला होता. याच सर्व प्रसंगावर भाष्य करणारा '377 अब Normal' सध्या एक नवा पायंडा पाडत आहे.
कलम ३७७ रद्द करण्यासाठी कशा प्रकारे लढा देण्यात आला आणि कशा प्रकारे भारत या ऐतिहासिक निर्णयाचा साक्षीदार झाला, हे सांगणारा '377 अब Normal' एका प्रगल्भ विषयाचा हाताळत आहे. १९ मार्चला झी 5वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मानवी गग्रू, तन्वी आझमी, झिशान आयुब, कुमुद मिश्रा आणि शशांक अरोरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी दाद दिली असून, खऱ्या अर्थाने भारतीय कलाविश्वात चौकटी बाहेरचे आणि अतिसंवेदनशील विषयही किती शिताफीने हाताळले जातात याची प्रचिती येत आहे.
समलैंगिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही पूर्णपणे सकारात्मक झाला आहे असं नाही. पण, '377 अब Normal' सारख्या प्रयत्नांनी समाजाची मनधरणी करण्यासाठी आणि वास्तव त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी फार वेळ दवडला जाणार नाही, अशीच चिन्हं आहेत.