मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला पाहता यावा, म्हणून निर्मात्यांची बाजू एकून घेतली आणि मल्टिप्लेक्सवाल्यांचा समाचार स्वत: जातीने घेईन, असे आश्वासन आम्हाला दिल्याचं निर्माते मदन आढाव, रावसाहेब काळे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घुमा हा सिनेमा ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी शिक्षणावर आधारीत आहे, हा सिनेमा सर्वांचं आकर्षण ठरत आहे, मात्र फार कमी ठिकाणी या सिनेमाला थिएटर उपलब्ध होत असल्याने निर्माते आणि दिग्दर्शक नाराज आहेत.


हिंदी, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषिक चित्रपटांच्या गर्दीत मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स थिएटर्स मिळणे आणि जर का मिळालेच, तरी अपेक्षित वेळा मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती दर्जेदार आणि प्रेक्षकांची इच्छा असूनही मराठी सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रेक्षकांची निराशा आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान होते आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन निर्माते मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सारंग बारस्कर  संतोष इंगळे  आणि रावसाहेब काळे यांनी मातोश्रीवर धाव घेतली आहे.


घुमा हा चित्रपट ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे ओस पडत चाललेल्या मराठी शाळा आणि एकूणच शालेय शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करणारा आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला पाहता यावा, म्हणून निर्मात्यांची बाजू एकून घेतली आणि मल्टिप्लेक्सवाल्यांचा समाचार स्वत: जातीने घेईन असे आश्वासन दिले.


'शिवसेना पूर्णपणे तुमच्या पाठिशी उभी आहे. कोणतीही अडचण आल्यास शिवसैनिक ती लगेच दूर करतील. मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना कुणाचीही पर्वा करणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. हा सिनेमा प्रत्येक मराठी माणूस पाहणार याची मला खात्री आहे.' असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.


चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे माहितीपत्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.  या प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई, पारनेरचे आमदार विजयराव औटी तसेच अहमदनगरचे शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड, नगरजिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते. पिकल एंटरटेनमेन्ट या चित्रपटाचे वितरक आहेत.