अहमदाबाद : दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं सोमवारी भारतात आगमन झालं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास औपचारिक स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वगताचा स्वीकार करत ट्रम्प ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे पुढील कार्यक्रमांसाठी निघाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावरुन थेट साबरमती आश्रमाला भेट देत त्यांनी येथे सूतकताईही केली. ज्यानंतर त्यांनी मोटेरा स्टेडियम गाठलं. मोठ्या संख्येने समर्थकांनी मोटेरा स्टेडियममध्ये यावेळी उपस्थिती लावली होती. या ठिकाणीसुद्धा अपेक्षेप्रामाणेच ट्रम्प यांचं स्वागत झालं. त्यावेळी एकच जल्लोषही पाहायला मिळाला. 


भारतीयांकडून आणि खुद्द मोदींकडून झालेलं हे स्वागत पाहता ट्रम्प यांनी आपल्या भाषणातून साऱ्यांचेच आभार मानले. यावेळी त्यांनी भारतातील उल्लेखनीय गोष्टींवर दृष्टीक्षेप टाकत साऱ्या जगासमोर देशाचं प्रतिनिधीत्त्वं करणाऱ्या प्रसंगांचा आणि व्यक्तींचा उल्लेख केला. 


ट्रम्प यांनी अतिशय उत्साहात हिंदी कलाविश्व अर्थात बॉलिवूडचंही भरभरून कौतुक केलं. Namastey Trump 'नमस्ते ट्रम्प' या जंगी कार्यक्रमात त्यांनी शाहरुख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असणाऱ्या DDLJ 'डीडीएल'जे अर्थात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चाही उल्लेख केला. शिवाय हिंदी कलाविश्वात मैलाचा दगड ठरलेल्या 'शोले'वरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. 



वाचा : #TrumpInIndia : 'त्या' वहीत ट्रम्प यांनी नेमकं काय लिहिलं?


'साऱ्या विश्वात बॉलिवूड चित्रपट पाहून प्रेक्षकांना अतिशय आनंद मिळतो', असं म्हणत त्यांनी 'डीडीएल'जे आणि 'शोले'चा उल्लेख केला. एका वर्षाला भारतात जवळपास २ हजार चित्रपट साकारले जातात असं म्हणत त्यांनी कलाविश्वाप्रतीचं आपलं निरिक्षण सर्वांपुढे ठेवलं. याशिवाय ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली या खेळाडूंची नावं घेत भारतीय क्रिकेट विश्वाचाही धावता आढावा सर्वांपुढे ठेवला. 



भारतीय कलाविश्वाविषयी ट्रम्प यांचं वक्तव्य पाहता पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची बॉलिवूडकडे असणारी ओढ पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हल्लीच प्रदर्शित झालेल्या, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाची स्तुती करणाऱं एक ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्रम्प यांचा हा फिल्मी अंदाज पाहता 'ये तो गजब हो गया', असं म्हणायला हरकत नाही.