...तर आत्महत्या करेन, फॅनची वरुण धवनला धमकी
एका महिला फॅनने वरूणला चक्क आत्महत्येची धमकीच दिली आहे.
मुंबई : फॅनच्या त्रासामुळे काय होऊ शकतं हे शाहरूख खानच्या ‘फॅन’ सिनेमात तुम्ही पाहिलंच असेल. अशा माथेफिरू आणि त्रास देणा-या अनेक फॅन्ससोबत स्टार्स मंडळींचा सामना होत असतो. आता ही मनस्तापाची वेळ अभिनेता वरूण धवन याच्यावर आली आहे. एका महिला फॅनने वरूणला चक्क आत्महत्येची धमकीच दिली आहे.
बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता वरुण धवनला एक महिला फॅन गेल्या काही दिवसांपासून त्रास देत असून त्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली आहे. हा त्रास इतका झाला की, वरूणने महिले विरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. ही महिला वरूणला व्हॉट्सअॅप आणि फोन करुन त्याला त्रास देत होती. त्यामुळे वरुणने या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.
वरुण तक्रारीत म्हणाला की, ‘ही महिला सतत व्हॉट्सअॅपवर मेसेज करते. या त्रासामुळे मी तिचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक केल्याने या महिलेने मला दुस-या क्रमांकावरून फोन केला. व्हॉट्सअॅप मेसेजचं उत्तर न दिल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी तिने दिली’.
वरुण धवनच्या लेखी तक्रारीनंतर सांताक्रूज पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांनाही पाठवण्यात आली आहे.