मुंबई : ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील पीडी हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं आहे. दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्बेतीबाबत अफवा पसरत आहेत. यामुळे दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी अधिकृतरित्या ट्विट करून माहिती दिली. दिलीप कुमार व्हेंटीलेटरवर नसून ऑक्सिजन सपोर्टची मदत घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून माहिती दिली आहे. सकाळी 11 वाजून 45 मिनिटांचे हे अपडेट आहेत. दिलीप साहेब ऑक्सिजन सपोर्टवर असून व्हेंटिलेटरवर नाहीत. प्लयुरल एस्पिरेशनच्या अगोदर काही टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. डॉ. जलील पालकर हे दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत आहेत.



दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी मीडियाला आग्रह करताना लिहितात की, मीडियाला एक विनंती आहे. दिलीप कुमार यांच्या करोडो चाहत्यांना मीडियाद्वारे माहिती मिळते. त्यामुळे अफवांना रोखून योग्य माहिती देऊन आम्हाला मदत करा. या अकाऊंटवर त्यांच्या तब्बेतीची माहिती दिली जाईल.



सायरा बानो म्हणाल्या, 'दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ते कोरोना रूग्णालय नाही. डॉ नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.' असं देखील सायरा बानो म्हणाल्या.