भारतात मुघलांचं मोठं योगदान, तरीही... ; नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानं खळबळ
शाह यांच्या वक्तव्यानं देशात एकच चर्चा..
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हे कायमच काही मुद्द्यांवर त्यांची परखड मतं मांडताना दिसतात. ज्यामुळं ते चर्चेत असतातच. आता पुन्हा एकदा शाह यांनी असं वक्तव्य केलंय ज्यामुळं त्यांच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (naseeruddin shah )
एका कार्यक्रमादरम्यान शाह यांनी 'मुघल रेफ्युजी आहेत...' अशा आशयाचं वक्तव्य केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
मुलाखतीदरम्यान शाह म्हणाले, 'मुघलांकडून करण्यात आलेल्या अत्याचारांचीच वारंवार चर्चा झाली आहे. पण, आपण हे काय विसरतोय की हे तेच मुघल आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी, भारतासाठी योगदान दिलं आहे.
हे तेच लोक आहेत ज्यांनी देशात काही स्मारकं उभारली आहेत. ज्यांच्या संस्कृतीमध्ये नाच, गाणं, चित्रकला आणि साहित्य आहे.
मुघल इथं आले, ते या देशाला आपलंसं करण्यासाठी तुम्ही त्यांना हवं तर शरणार्थी म्हणू शकता.'
शाह यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुघलांपूर्वी या देशात वास्तूकला नव्हती का? असा सवाल काहींनी उपस्थित केला.
मुघलांना प्रवासी हाच योग्य शब्द होता, शरणार्थी नव्हे, असं म्हणत काहींनी शाह यांच्या वक्तव्यावर आपली मतं मांडली.
शाह यांच्या एका वक्तव्यामुळं इतक्या चर्चांनी जोर धरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीची त्यांच्या वक्तव्यानं अनेक विषयांना फाटे फोडल्याचं पाहायला मिळालं होतं.