मुंबईः आजकाल सोशल मीडियावर अनेकदा भरमसाठ अफवा या पसरत असतात. त्यातून कोणाच्या खोट्या निधनाच्या बातम्या येऊ लागल्या तर सगळीकडेच एक गंभीर आणि भितीचे वातावरण तयार होते. सेलिब्रेंटीच्या अशाच अनेक खोट्या बातम्या गेल्या काही वर्षांत अनेकदा व्हायरल झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा याची झळ पाहायला मिळते आहे. यावेळी बॉलीवूडचा अभिनेता शर्मन जोशी या खोट्या बातम्यांच्या कचाट्यात सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. ज्यावर प्रेम चोप्रा यांनी स्वतःहून खुलासा केला होता आणि आपल्या निधनाची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. आता प्रेम चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्याच कारणासाठी. पण यावेळी त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरल्या नसून त्यांचा जावई शर्मन जोशीच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण या बातमी काहीच तथ्य नसल्याचे पुन्हा एकदा सासरे प्रेम चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे. 


'रंग दे बसंती', 'गोलमाल' आणि '3 इडियट्स' यांसारख्या बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेल्या शर्मन जोशीच्या मृत्यूची अफवा अचानक सोशल मीडियावर पसरू लागली. यानंतर लोकांनी शर्मनचा शोध सुरू केला. शर्मन पूर्णपणे बरा असून त्याला काहीही झालेले नाही. यापूर्वी शर्मनचे सासरे प्रेम चोप्रा यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यास सुरुवात झाली होती. यानंतर प्रेम चोप्राने स्वतः सांगितले की, तो पूर्णपणे ठीक आहे.


नागपुरात जन्मलेला शर्मन जोशी हा गुजराती अभिनेता अरविंद जोशी यांचा मुलगा आहे. गुजराती रंगभूमीपासून सुरुवात केलेल्या शर्मनने १९९९ मध्ये 'गॉडमदर' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर शर्मनने 'स्टाइल', 'रंग दे बसंती', 'गोलमाल', 'लाइन इन अ मेट्रो', 'ढोल', '3 इडियट्स', 'हेट स्टोरी 3', 'मिशन मंगल' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. शर्मन जोशीने वयाच्या 21 व्या वर्षी प्रेम चोप्राची मुलगी प्रेरणा चोप्रा हिच्याशी लग्न केले. शर्मनची बहीण मानसी जोशी देखील एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिने अभिनेता रोहित रॉयशी लग्न केले आहे.