मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जीनत अमान गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. आता अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या आगामी 'पानीपत' चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानीपत'मध्ये अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १७६१ मध्ये अफगाण आणि मराठ्यांमध्ये  झालेल्या पानीपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'पानीपत'ची शूटिंग सुरु करण्यात आली आहे. चित्रपटात जीनत अमान यांच्या भूमिकेविषयी बोलताना आशुतोष गोवारिकर यांनी 'जीनत अमान 'पानीपत'मध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसणार असून त्या सकीना बेगम ही भूमिका साकारणार असल्याचं' त्यांनी म्हटलंय. जीनत अमान यांच्या लूकबाबत गुप्तता बाळगत आशुतोष यांनी ते जीनत यांच्यासोबत काम करण्यासाठी अतिशय उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. 



१९८९ मध्येही आशुतोष आणि जीनत अमान यांनी 'गवाही' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त व्यतिरिक्त चित्रपटात मोहनीश बहल, कुणाल कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरेदेखील भूमिका साकारणार आहे. पुढच्या आठवड्यापासून जीनत अमान या चित्रपटासाठी शूटिंग सुरु करणार आहेत. यंदा ६ डिसेंबर रोजी 'पानीपत' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


जीनत अमान यांनी ५० वर्षांच्या करियरमध्ये जवळपास ८०हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.