मुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन झालं आहे, ते ९२ वर्षांचे होते. मागच्या आठवड्यापासून ते मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. बऱ्याच कालावधीपासून खय्याम यांची तब्येत खराब होती. सोमवारी संध्याकाळी त्यांची तब्येत आणखी खालावली. खय्याम यांचं नाव मोहम्मद जहूर खय्याम हाशमी होतं, पण चित्रपटसृष्टीत त्यांना खय्याम याच नावाने ओळखलं जायचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कभी, कभी, उमारव जान, नुरी, रझिया सुलतान, त्रिशूल, फिर सुबह होगी यांच्यासारख्या यशस्वी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. खय्याम यांना 2011 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर तीनवेळा खय्याम यांचा फिल्मफेयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. याचसोबत खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कारही मिळाला.


खय्याम यांनी पहिल्यांदा हीर रांझा या चित्रपटासाठी संगीत दिलं, पण मोहम्मद रफी यांचं गीत 'अकेले में वह घबराते तो होंगे' याने त्यांना ओळख मिळाली. 'शोला और शबनम' या चित्रपटाच्या संगीताने खय्याम यांना चित्रपटसृष्टीत स्थापित केलं. खय्याम यांची पत्नी जगजीत कौर यादेखील गायिका आहेत. त्यांनी खय्याम यांच्यासोबत 'बाजार', 'शगुन' आणि 'उमराव जान' या चित्रपटासाठी काम केलं.


१९५० ते १९९० या कालावधीमध्ये खय्याम यांनी संगीत क्षेत्रात काम केलं. १९९० नंतर मात्र खय्याम चित्रपटसृष्टीपासून लांब झाले.