Bappi Lahiri का घालायचे इतके दागिने, किंमत बेशुद्ध करणारी
हिंदी कलाजगतामध्ये `डिस्को` ठेका असणारी गाणी बप्पी दांनी चाहत्यांच्या भेटीला आणली.
मुंबई : ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच या कलाकारानं जगाचा निरोप घेतला. (Lahiri death)
बप्पी लहरी हे त्यांच्या मनमिळाऊ आणि तितक्याच प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जात होते. संगीतदिग्दर्शन, गायन यासोबतच त्यांनी रिअॅलिटी शोसाठी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती.
जिथे सध्याची पिढी डीजेच्या तालावर थिरकते, तिथेच हिंदी कलाजगतामध्ये 'डिस्को' ठेका असणारी गाणी बप्पी दांनी चाहत्यांच्या भेटीला आणली.
बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड आणणाऱ्या बप्पी दा यांना 'गोल्ड मॅन' म्हणूनही ओळखलं जात होतं. सोन्याच्या दागिन्यांची त्यांना विशेष आवड. त्यातही त्यांच्याकडे असणारे दागिने आणि याप्रती असणारं त्यांचं वेड म्हणजे कोणाच्याही समजण्यापलीकडलं.
का होती इतकी आवड?
काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार बप्पी लहरी यांच्याकडे असणारे, ते कायम वापरत असणारे दागिने इतके महागडे की त्या किंमतीत साधारण 4 ऑडी या महागड्या कार खरेदी करता येतील.
त्यांच्या दागिन्यांची किंमत ही साधारण 12 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, या आकड्यामध्येही खरा आकडा मात्र कायम गुलदस्त्यातच राहिला.
काही वर्षांपूर्वी बप्पी दांनी इलेक्शन कमिशनकडे दिलेल्या पत्रकातील माहितीप्रमाणे त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आहे. याची किंमत त्यावेळी 1767451 इतकी दाखवण्यात आली होती.
तर त्यांच्या पत्नी चित्रानी यांच्याकडे 967 इतकं सोनं होतं. ज्याची किंमत 2074830 रुपये इतकी होती.
'Disco King' अशी ओळख असणाऱ्या बप्पी दा यांच्याकडे चांदीचेही तितकेच दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे आणि त्यांच्याकडे मिळून प्रचंड सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा खजिना होता.
बप्पी दांची अस्थायी संपत्ती ही 2.93 कोटी रुपयांची तर, अस्थायी संपत्ती 9 कोटी रुपयांची असल्याची माहिती समोर आली होती. हा आकडाकाही वर्षांपूर्वीचा असल्यामुळे आजच्या दिवसापर्यंत सगाजिकच त्यात भर पडली असणार ही बाब नाकारता येत नाही.
इथे लक्ष देण्याजोगी बाब अशी, की बप्पी लहरी यांच्या पत्नीकडे त्यांच्याहूनही जास्त सोनं- चांदी आणि हिरे- माणकांचे दागिने आहेत.
एका मुलाखतीत सांगितलं या वेडामागचं कारण...
बप्पी लहरी यांना असणारं हे मौल्यवान दागिन्यांचं वेड शब्दांत मांडता येणार नाही असं होतं. एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारणंही सांगितलं होतं.
'Elvis Presley हे अमेरिकन गायक ह़ॉलिवूडमध्ये सोन्याची साखळी गळात घालत असत. मला ते फार आवडत होते. त्याचवेळी मी ठरवलं की मी यशस्वी होऊन ते यश वेगळ्या पद्धतीने साजरा करेन. त्या क्षणी मी खूर सारं सोनं वापरू लागलो, सोनं माझ्यासाठी भाग्याचं प्रतीक आहे', असं ते म्हणाले होते.