Uri box office collection : `उरी`ने ओलांडलं कोट्यवधींच्या कमाईचं शतक
जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
मुंबई : अवघ्या २८ कोटींच्या निर्मिती खर्चात साकारलेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने दहाव्या दिवशी कोट्यवधींच्या कमाईचं शतक पूर्ण केलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली.
''उरी....'ने फक्त शंभर कोटींच्या कमाईचा आकडाच ओलांडला नाही, तर २०१९ या वर्षातील तो पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरत आहे'', असं त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं.
२०१६ मध्ये भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात सर्जिकल स्ट्राईक करत शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिलं होतं. याच घटनेवर 'उरी...' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य धर याने कलाकारांची फौज उभी करत साकारलेल्या उरीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून, एकीकडे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेच्या चर्चा होतानाच यामध्ये आता अभिनेता विकी कौशलचाही समावेश झाला आहे.
विकीने साकारलेली सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका त्याला प्रसिद्धीझोतात आणत असून, चाहत्यांच्या मनावर तो खऱ्या अर्थाने राज्य करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या 'उरी' या चित्रपटाला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'ची टक्कर होती. पण, प्रेक्षकांचा कल मात्र 'उरी'च्याच दिशेला पाहायला मिळाला, ज्या कारणास्तव या चित्रपटाने कोट्यवधींच्या कमाईचं शतक ओलांडलं.