मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटानंतर देशभक्तीला जे काही उधाण आलं त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. अभिनेता विकी कौशलच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या या चित्रपटातील एक संवादही विशेष लोकप्रिय ठरला. तो संवाद म्हणजे, 'How's the josh?' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपगृहापासून ते मित्रमंडळींच्या कट्ट्यापर्यंत सर्वत्रच 'How's the josh?' हे तितक्याच आवेगाने बोललं गेल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना सध्याही या संवादाची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटात लक्षवेधी ठरलेल्या याच संवादासाठी विकीचा मात्र नकार होता. खुद्द दिग्दर्शक आदित्य धरने याविषयीची माहिती दिली. ज्येष्ठ पटकथा लेखक रॉबिन भट्ट यांच्याशी 'वार्तालाप' या कार्यक्रमात संवाद साधतेवेळी त्याने How's the josh?चा हा किस्सा सांगितला. ज्यात ऐन चित्रीकरणाच्याच वेळी हा संवाद बदलण्याच्या विचारही केला गेला असल्याचीही बाब समोर आली. 


'उरी...'तील याच लोकप्रिय संवादाविषयी सांगत आदित्य म्हणाला, 'म्यानमार येथील चकमकीचं चित्रीकरण करतेवेळी प्रथमच How's the josh? ही ओळ चित्रीत करण्यात आली. त्यावेळी दृश्याच्या चित्रीकरणाच्या काही मिनिटांपूर्वीच विकी माझ्यापाशी आला आणि त्याने ही ओळ बदलण्याविषयीची विचारणा केली. ओळीतून भाव व्यक्त होत नसल्याचा मुद्दा त्याने मांडला होता. ज्यावर मी त्याला सैनिक त्यांच्या साथीदारांचा प्रोत्साहित करण्य़ासाठी असंच बोलतात हे पटवून देत निदान एक प्रयत्न करण्यास सांगितलं'. 



आदित्यच्या सांगण्यावरुन विकी ती ओळ अगदी उत्साहात म्हणाला आणि त्या क्षणी उपस्थित असणाऱ्या जवळपास तीसहून अधिक जणांच्या अंगावर काटाच उभा राहिला. विकीचा नकार असतानाही ज्या ओळीचा चित्रपटात समावेश करण्यात आला ती लोकप्रियतेच्या सव्र सीमा ओलांडेल अशी अपेक्षाही अनेकांनी केली नसावी. पण, अतिशय प्रेरक अशी ही ओळ खऱ्या अर्थाने उरीसाठी अतिशय फायद्याची ठरली असं म्हणायला हरकत नाही.