तुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला `जर आमच्यावर...`
विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ आपला आगामी चित्रपट `मेरी ख्रिस्मस`च्या प्रमोशनसाठी चेन्नईत आले होते. यावेळी हिंदी भाषेवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला विजय सेतुपथीने चांगलंच झाडलं.
अभिनेता विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट 'मेरी ख्रिस्मस'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच दोघेही चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह चेन्नईत पोहोचले होते. दरम्यान तिथे आयोजित एका पत्रकार परिषदेत विजय सेतुपथीला हिंदीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानेही सणसणीत उत्तर देत तामिळनाडूने हिंदीला कधीच नाकरलेलं नाही असं म्हटलं. यावेळी त्याने लोकांनी हिंदी लादण्याला विरोध दर्शवला असल्याचं स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ यांचा 'मेरी ख्रिस्मस' चित्रपट 12 जानवेरीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ या दोन्ही भाषेत रिलीज होणार आहे. 7 जानेवारीला चेन्नईत झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विजय सेतुपथीला हिंदी भाषेवरील प्रश्नांचा भडीमार केला. तामिळनाडूत मागील 75 वर्षांपासून हिंदीला विरोध करण्याचं राजकारण सुरु आहे असं तो म्हणाला. तसं अनेक लोक 'आपल्याला हिंदी समजत नाही' असे टी-शर्ट घालत असल्याचं सांगितलं.
यावेळी विजय सेतुपथीने त्याला रोखलं आणि सागितलं की, 'हिंदीला एक भाषा म्हणून आम्ही कधीच विरोध केलेला नाही'. पत्रकाराने यावेळी विजय सेतुपथीला रोखलं आणि ही भाषा शिकली पाहिजे का? अशी विचारणा केली. यावर विजय सेतुपथी संतापला आणि म्हणाला की, 'तुम्ही हाच प्रश्न आमीर खानलाही विचारल्याचं मला आठवतं. तुम्ही तोच प्रश्न वारंवार का विचारत आहात? आम्ही हिंदीला कधीच नाही म्हटलेलं नाही. आम्ही हिंदी लादण्याला विरोध करत आहोत. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. येथील लोकही हिंदी शिकत आहेत आणि कोणीही त्याच्या विरोधात नाही. तुमचा प्रश्न चुकीचा आणि संबंध नसणारा आहे. कोणीही कोणाला हिंदी शिकण्यापासून रोखत नाही आहे. मंत्र्यानेही यावर स्पष्टीकरण दिलं असून जर ते पाहा'.
विजय सेतुपथी 'मेरी ख्रिस्मस' चित्रपटात कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ख्रिस्मस 2023 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा होती.
दरम्यान चेन्नईतील या पत्रकार परिषदेत विजय सेतुपथीने दोन्ही इंडस्ट्री किती चांगल्या पद्धतीने एकमेकांत मिसळल्या आहेत हे सांगितलं. "टीझर लॉन्च दरम्यान, मला दक्षिण आणि उत्तरेतील चित्रपटांमधील भिंतीबद्दल विचारण्यात आलं. यावेळी मंचावरील एका व्यक्तीने सांगितलं की, ओटीटीच्या प्रवेशानंतर भिंत कोसळली, जी आता स्पष्टपणे दिसून येत आहे", असं विजय सेथुपती म्हणाला.