बॉलिवूड चित्रपट '12th Fail' च्या यशामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या चर्चेत आहे. दरम्यान त्याने 2018 मध्ये केलेल्या एका ट्वीटसाठी माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये त्याने प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये रामभक्तांवर निशाणा साधण्यात आला होता. विक्रांत मेस्सीने माफी मागताना आपली लोकांच्या किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रांत मेस्सीने एका वृत्तपत्रातील कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमधून राजकीय स्थितीवर उपहासात्मकपणे भाष्य करण्यात आलं होतं. यामध्ये सीतेला वृत्तपत्र वाचताना दाखवण्यात आलं होतं. या वृत्तपत्रात महिला अत्याचारासंबंधी बातम्या होत्या. या बातम्या वाचल्यानंतर सीतामाता रामाला 'मला खूप बरं वाटत आहे की माझं अपहरण रावणाने केलं होतं तुमच्या भक्तांनी नाही' असं सांगताना दाखवण्यात आलं होतं. 


हे ट्वीट शेअर करताना विक्रांत मेस्सीने लिहिलं होतं की, अर्धे शिजलेले बटाटे आणि अर्धे राष्ट्रवादी फक्त पोटदुखीला कारणीभूत ठरतात. 


 


विक्रांत मेस्सीने मागितली माफी


या ट्विटवरुन टीका होऊ लागल्यानंतर विक्रांत मेस्सीने माफी मागितली आहे. तसंच त्याने आपलं ते जुनं ट्विट डिलीट केलं आहे. विक्रांत मेस्सीने एक्सवर माफी मागणारी पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "2018 मध्ये माझ्या एका ट्विटच्या संदर्भात, मी काही सांगू इच्छितो. हिंदू समाजाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. पण मी थट्टेने केलेल्या ट्विटबद्दल सर्व काही मागे सोडू इच्छितो. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र न जोडताही असंच म्हणता आलं असतं”. 



मुंबईतील वकील अभिषेक दुबे यांनी विक्रांत मेस्सीसह केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट जोडल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. 



विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12th Fail’ हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. गरिबीवर मात करून आयपीएस अधिकारी होईपर्यंतचा त्यांचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Disney+ Hotstar वर उपलब्ध आहे. 


दरम्यान 12th Fail चित्रपटानंतर विक्रांत मेस्सीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. तो सध्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात राशी खन्ना आणि रिद्धी डोगराही मुख्य भूमिकेत आहेत. 3 मे 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.