बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी रोज मुंबईत दाखल होत असतात. यातील काहींना यश मिळतं तर काहींना मात्र रिकाम्या हाती परतावं लागतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकदा हे तरुण-तरुणी कुटुंबाचा विरोध पत्करुन घराबाहेर पडलेले असतात. यामधील एक नाव म्हणजे 60-70 चं दशक गाजवणारे सुपरस्टार विनोद खन्ना यांचं आहे. विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे वडील फार नाराज होते. पण विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत सुपरस्टार झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद खन्ना यांनी जेव्हा सर्व काही सोडून मुंबईत येण्याचं ठरवलं होतं, तेव्हा त्यांचे वडील फार नाराज झाले होते. आपल्या मुलाला अभिनेता व्हायचं आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी रौद्ररुप धारण केलं होतं. 'तू जर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी गेलास, तर मी तुला गोळी घालेन,' अशी धमकीच त्यांनी दिली होती. इतकंच नाही तर विनोद खन्ना यांच्यावर थेट बंदूकच रोखली होती. 


ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा विनोद खन्ना फार तरुण होते. तेव्हा ते चित्रपटांमध्ये आलेले नव्हते. पण आपण हिरो व्हावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. विनोद खन्ना यांचं चित्रपटांप्रती वेड पाहून वडील फार नाराज झाले होते. मुलाने आपला व्यवसाय सांभाळावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. 


पण विनोद खन्ना यांनी शाळेत असल्यापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची स्वप्नं पाहण्यास सुरुवात केली होती. एकदा शिक्षकाने शाळेतील एका समारंभानिमित्त आयोजित नाटकात त्यांना सहभागी करुन घेतलं. विनोद खन्ना यांनी शाळेच्या या नाटकात फार चांगला अभिनय केला होता. विनोद खन्ना यांच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक केलं. कौतुकामुळे हुरुप आलेल्या विनोद खन्ना यांनी यानंतर प्रत्येक वर्षी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. जसजसा वेळ जात होता तसंतसे विनोद खन्ना नाटकामुळे शाळेत प्रसिद्ध झाले. हा मुलगा मोठा होऊन चित्रपटात काम करेल, हिरो होईल असं प्रत्येकजण म्हणत होता. यानंतर विनोद खन्नाही हिरो होण्याचं स्वप्न पाहू लागले. 


विनोद खन्ना यांना जेव्हा 'मन का मीत' चित्रपटासाठी साईन करण्यात आलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. ही आनंदाची बातमी देण्यासाठी ते घरी पोहोचले. पण त्यांनी आपण चित्रपटात काम करणार असल्याचं सांगताच त्यांचे वडील किशनचंद खन्ना संतापले. त्यांनी आपली बंदूक विनोद खन्ना यांच्यावर रोखली आणि जर तू चित्रपटात काम केलंस तर गोळी घालेन अशी धमकी दिली. 


अखेर विनोद खन्ना यांच्या आईने मध्यस्थी करत वडिलांना शांत केलं. यानंतर किशनचंद खन्ना यांनी विनोद खन्ना यांना सांगितलं की, 'मी तुला दोन वर्षांचा वेळ देतो. जर या दोन वर्षात तू काही होऊ शकला नाहीस तर गप्पपणे चित्रपट सोडून कामावर यायचं'. यानंतर विनोद खन्ना यांनी मेहनत घेण्यास सुरुवात केली. अखेर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि एक दमदार अभिनेता म्हणून सगळे ओळखू लागले.