सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर विवेक अग्निहोत्रीचं स्पष्टीकरण
सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधून एका पाठोपाठ एक खुलासे समोर येत आहेत. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. त्यांनी बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडवर एक आरोप देखील लगावला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परंतु त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही.
ट्विटरवर एका युझरने विवेक अग्निहोत्री यांना सुशांत संबंधीत एक प्रश्न विचारला आहे. 'जेव्हा तो जिवंत होता तेव्हा तुम्ही त्याला एखादा चित्रपट ऑफर करू शकत होता. या प्रश्नाचे उत्तर देत विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'मी त्याला 'हेट स्टोरी' हा चित्रपट ऑफर केला होता. परंतु बालाजीने त्याला नकार दिला.' असं ते म्हणाले.
सांगायचं झालं तर जेव्हा अग्निहोत्रींनी त्याला चित्रपट ऑफर केला होता तेव्हा तो बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडसाठी एका मालिकेत काम करत होता. विवेक यांच्या ट्विटनंतर बालाजी टेलीफिल्म्सवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागील नक्की कारण काय आहे. याचा पोलीस तपास घेत आहेत. मुंबईतील मोठ्या निर्मात्यांनी सुशांत सिंह राजपूत यांच्यावर बहिष्कार घातला होता याचीही चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या दृष्टीकोनातून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.