मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पद्मश्री, पद्मभूषण आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त वहिदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक उत्तम नृत्यांगना देखील आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, त्या काळी मुस्लिम धर्मामुळे त्यांच्या डान्स गुरुने त्यांना भरतनाट्यम शिकवण्यास नकार दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वहिदा रहमान यांनी 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या सेटवर याचा खुलासा केला होता आणि सांगितलं होतं की, भरतनाट्यम गुरूने त्यांना नृत्य शिकवण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी त्यांच्या गुरूला समजवलं, पण यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. एवढच नव्हे तर गुरूंनीही आधी कुंडली बनवली, मग त्यांना नृत्य शिकवलं.


भरतनाट्यम शिकवायला दिला होता नकार  
वहिदा रेहमान यांनी ही आठवण सांगताना  म्हटलं की, ' मी चेन्नईत असताना मला खूप नाव असलेल्या गुरूकडून भरतनाट्यम शिकायचं होतं. माझ्या एका मित्राला सांगितलं की, मला त्यांच्याकडून नृत्य शिकायचं आहे. मित्राने त्यांना विचारलं असता त्या गुरुंनी, ती मुलगी मुस्लिम आहे त्यामुळे मी तिला नृत्य शिकवू शकत नाही.असं कारण दिलं . 


पण माझ्या धर्माचा याच्याशी काय संबंध? कुणीही मुस्लिम असो वा ख्रिश्चन किंवा हिंदू असो कलेमध्ये धर्म येता कामा नये. असं मला वाटत होतं. 'मी त्यांना खूप आग्रह केला, माझ्या मित्राकडे, माझ्या आईच्या मैत्रिणीकडे सगळ्यांकडे खूप हट्ट धरला.  


यानंतर गुरु म्हणाले, ''बरं तुझी कुंडली घेऊन ये.''  यावर मी म्हणाले, आमच्यामध्ये कुंडलीवैगरे बनवत नाहीत. त्यावर ते म्हणाले, ही एक मोठी समस्या आहे. बरं! मग वाढदिवसाची तारीख सांगा.  मी स्वतः कुंडली बनवतो. म्हणून त्यांनी कुंडली बनवली. कुंडली बघून ते म्हणाले, ''अरे ही तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. ही मुलगी माझी सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी असेल असं ही कुंडली दर्शवते. एवढच नाही तर ही कुंडली तुम्ही खूप यशस्वी व्हाल असंही संकेत देत आहे.''


त्यानंतर त्या गुरुंनी मला नृत्य शिकवायला सुरुवात केली. याच काळात मला चित्रपटांच्याही ऑफर येऊ लागल्या आणि त्या गुरुंनी सांगितल्या प्रमाणे मी यशस्वी होत गेले. अशी आठवण सांगून वहिदा रहमान यांनी त्या गुरुंचे आभारही मानले.



वहिदा रहमान यांनी 1955 मध्ये तेलुगू चित्रपट रोजुलु मरायीद्वारे अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गुरु दत्तच्या 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौदविन का चांद' आणि 'साहेब बीबी और गुलाम' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांची मने जिंकली.  1965 मध्ये 'गाईड' मधून त्यांना ओळख मिळाली. यानंतर त्यांनी अनेक यशाच्या नव्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.