मुंबई : अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २९ डिसेंबरपासून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासह तो सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. अवघ्या काही सेकंदांच्या या प्रोमोमध्ये कपिलच्या सेटवर आलेले पाहुणे पोट धरुन हसताना दिलसत आहेत. कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या पहिल्याच भागात कपिलला लाभलेले पाहुणे आहेत अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता रणवीर सिंग. 


'सिंबा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सारा आणि रणवीर कपिल शर्मा शोच्या सेटवर पोहोचले असून, तेही या सेटवरील वातावरणात एकरुप झाल्याचं पाहायला मिळत आहे. 




कपिलची ही नवी इंनिंग त्याच्या काही जुन्या साथीदारांसहच सुरु होत आहे. आता त्यातील एका साथीदाराची म्हणजेच किकू शारदाची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण, उर्वरित सदस्यांचा चेहरा मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. 


जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर आणि आयुष्यातील बऱ्याच चढ-उतारानंतर कपिल नव्या आत्मविश्वासासह पुन्हा या कलाविश्वात प्रवेश करत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. तेव्हा आता आपल्या कार्यक्रमाचं आणि आपलं स्थान पुन्हा मिळवण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात तो यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.