`अंधाराची वाट चाले....`, पाहा `अग्निहोत्र २`च्या शीर्षक गीताची झलक
असं साकारलं हे गीत...
मुंबई : आजवर छोट्या पडद्यावर मम्हणजेच मालिका विश्वाक कैक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात आणि थेट त्यांच्या घरातही स्थान मिळवलं. मालिकांमधील पात्रांना प्रेक्षकांनी स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची जागा दिली. अशा या मालिकांच्या गर्दीत स्वत:चं वेगळेपण जपत आणि आता नव्या अंदाजा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेली एक मालिका म्हणजे 'अग्निहोत्र २'.
मालिकेची घोषणा केल्यापासूच त्याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. त्यातही मालिकेची पहिली झलक पाहिल्यानंतर ही उत्सुकता वाढली. मालिकेविषयीचं हेच कुतूहल आणि उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता, बहुप्रतिक्षित अशा मालिकेच्या शीर्षक गीताची एक झलक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.
कोणत्याही मालिकेता गाभा म्हणजे शीर्षकगीत. आजवर बऱ्याच मालिकांच्या शीर्षकगीतांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याच धर्तीवर 'अग्निहोत्र २'चं शीर्षकगीतही साकारण्यात आलं आहे. हे गीत नेमकं कसं साकारलं गेलं, याविषयीचाच मिनिटभराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये मालिकेच्या नावाला साजेशा अशा बऱ्याच जमेच्या बाजू पाहायला मिळतात.
राहुल रानडेने संगीतबद्ध केलेलं हे गीत वेदश्री ओकने गायलं आहे, तर अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी हे गीत लिहिलं आहे. ‘तळहाती घेउनिया निखारा हा रात्री; अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री', असे शब्द कानांवर पडताच एका वेगळ्या दुनियेत गेल्याची अनुभूती होते.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली, तेव्हा अभिनेते शरद पोंक्षे यांचा अंदाज अधोरेखित करण्याजोगा ठरला. आजारावर मात करत त्यांची ही नवी इनिंग खऱ्या अर्थाने गाजत आहे, याला अनेक निमित्तंही आहेत. त्यातीलच एक निमित्त म्हणजे 'अग्निहोत्र २', तेव्हा आता या पूर्ण गीताची आणि अर्थातच मालिकेची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे, हेच खरं.