मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सध्या शूजित सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. देशात ज्या काही घडामोडी सुरु आहेत, त्या संबंधीत ते नेहमीच आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत असतात. नुकताच वांगणीमध्ये 'महालक्ष्मी एक्सप्रेस' अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्यात अडकली होती. तेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या अथक प्रयत्नांमुळे एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या तब्बल १ हजार ७०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांची मदत करण्याच्या या धाडसी आणि प्रशंसनीय अंदाजामुळे बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय रेल्वे, भारतीय वायूसेना, नौदल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रशासनाचे कौतुक केले आहे. 'बचाव कार्याच्या माध्यमातून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ७०० पेक्षा अधिक प्रवाशांची सुटका केल्यामुळे एनडीआरएफला खूप शुभेच्छा. हे एक शूर आणि यशस्वी अभियान होते. म्हणून मला त्यांचा गर्व आहे. जय हिंद... '


अशा प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. अमिताभ बच्चन लवकरच चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहेत. 'गुलाबो-सिताबो' चित्रपटाच्या माध्यमातून ते रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 


मालक आणि भाडेकरू यांच्या प्रेम-घृणेच्या नात्या भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. चित्रपटात अमिताभ घर मालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेता आयुषमान खुराना भाडेकरूच्या भूमिकेत झळकणार आहे.