दुबईतल्या हॉटेलमध्ये श्रीदेवीला नेमकं काय झालं?
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
दुबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवीनं अखेरचा श्वास घेतला. दुबईमध्ये नातेवाईकाच्या लग्नासाठी श्रीदेवी कुटुंबासोबत गेली होती. श्रीदेवीला हृदय विकाराचा कोणताही त्रास नसल्याचं स्पष्टीकरण तिचा दिर संजय कपूरनं दिलं आहे.
दुबईमधल्या जुमैरा एमिराट्स टॉवर या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबली होती. हॉटेल रुमच्या बाथरूममध्ये श्रीदेवी बेशुद्ध आढळून आली. यानंतर तिला दुबईच्या राशित रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास श्रीदेवीनं अखेरचा श्वास घेतला.
पोस्टमॉर्टम झालं पण अजूनही रिपोर्ट नाही
श्रीदेवीच्या पार्थिवाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना देण्यात आलेला आहे. पण पोलिसांनी अजूनही त्यांच्या चौकशीचा रिपोर्ट तयार केलेला नाही. श्रीदेवीचे नातेवाईक अजून फॉरेंन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत, अशी माहिती खलीज टाईम्स या वृत्तपत्रानं दिली आहे. दुबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेल्या मृत्यूची चौकशी पूर्ण व्हायला २४ तासांचा अवधी लागतो. श्रीदेवीच्या मृत्यूच्या चौकशीवेळीही हे नियम पाळले जात आहेत.
म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम
दुबई हे युएईमधलं प्रमुख शहर आहे. इथल्या कायद्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम करून केलं जातं. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात. हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात. यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.