मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर बॉलिवूडमध्येही 'हॅशटॅग मी टू' (#MeeToo) चळवळ उभी राहील, असं चित्रं निर्माण झालंय. या निमित्तानं झगमगत्या चंदेरी दुनियेतली काळी बाजू आता थेट लोकांसमोर येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटसृष्टी आणि महिलांशी गैरवर्तन ही नवीन गोष्ट नक्कीच नाही. बालकलाकार म्हणून काम करत असताना आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गौप्यस्फोट ६६  वर्षीय डेझी इराणी यांनी काही महिन्यांपूर्वी केला. तर तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर, कंगना राणौतनंही दिग्दर्शक विकास बहलविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. 


गायक कैलाश खेरने एका मुलाखती दरम्यान आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप एक महिला पत्रकारानं केलाय. चित्रपटसृष्टीतील हा भयावह चेहरा आता अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागलाय. 



राखी सावंत, पूजा भट्ट, ऐश्वर्या राय, प्रिती झिंटा अशा अनेक अभिनेत्रींनी आपल्यावरील अत्याचाराविरोधात वेळीच आवाज उठवला खरा, पण तक्रारीपुरताच तो मर्यादित राहिला. 


लैंगिक अत्याचार, कास्टिंग काऊचच्या शिकार केवळ अभिनेत्रीच होतात असं नाही, तर पुरुषांनाही याचा सामना करावा लागतो. अभिनेता रणवीर सिंगने एका मुलाखतीमध्ये याबाबतचा आपला अनुभव मांडला. 


अशा परिस्थितीत #MeeToo चळवळीनं लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाविरोधात आवाज उठवायला बळ मिळालंय. या निमित्ताने नाव घेऊन व्यक्त होण्याचं धाडस काहीजण दाखवताहेत हे कौतुकास्पद आहे. 


चंदेरी दुनियेतील शोषणकर्त्यांचा खरा चेहरा उघड व्हावा, असं वाटत असेल तर केवळ पाठिंबा देणं पुरेसं नसून, कारवाईसाठी सर्वांनीच आग्रह धरला पाहिजे. तेव्हाच ही वाईट प्रवृत्ती रोखली जाईल. नाही तर काही काळ चर्चेपुरतंच त्याचं अस्तित्व राहील.