या स्टारचा मुलगा ही अडकला होता ड्रग्ज प्रकरणात, तेव्हा संपूर्ण जगाची मागितली माफी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात आणखी तीन दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात आणखी तीन दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत. आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. नंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनेक वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागला नाही. आज, जामीन अर्जावर, मुंबई कोर्टाने 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी करु असे सांगितले आहे. ड्रग प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेत राहिले आहे. आर्यनच्या बाजूने आणि विरोधात अनेक ट्रेंड पाहिले जात आहेत. त्यांच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
विशेष म्हणजे आर्यन खान पकडल्यानंतर ट्विटरवरील अनेक युजर्स शाहरुख आणि गौरी खानच्या पालकत्वावर सातत्याने प्रश्न विचारत आहेत. या संबंधात, किंग खानची तुलना हॉलिवूड स्टार जॅकी चॅनसोबतही केली जात आहे. खरं तर, आजपासून सात वर्षांपूर्वी, अॅक्शन किंग जॅकी चॅनचा मुलगा जेसी चॅन देखील ड्रगच्या प्रकरणात अडकला होता. आर्यन प्रकरणाप्रमाणे, हे प्रकरण ही चीनमध्ये हायप्रोफाईल प्रकरण बनले होते. 2014 मध्ये, बीजिंग पोलिसांनी ड्रगच्या आरोपाखाली जेसी चॅनला अटक केली होती. जेसीच्या घरातून गांजा सापडला होता. वैद्यकीय चाचणीमध्ये, 32 वर्षीय जेसी प्रतिबंधित औषधे सेवन केल्याबद्दल दोषी असल्याचे सिद्ध झाले. तपासात आणखी अनेक स्टार्सची नावे समोर आली आणि हेही उघड झाले की अनेक सेलिब्रिटी जेसीच्या घरात ड्रग्जसाठी येत -जात होते.
जॅकी चॅनसाठी संपूर्ण प्रकरण खूप कठीण होते. मुलाला पकडल्यामुळे त्याला खूप त्रासही सहन करावा लागला. खरं तर, त्या वेळी अभिनेता चीनी पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा राजदूतही होता. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पण जेव्हा त्याचाच मुलगा अडकला तेव्हा तो लोकांच्या निशाण्यावर आला. जेसीवर आरोप झाल्यानंतर जॅकी मीडियासमोर हजर झाला आणि त्याने जाहीरपणे संपूर्ण जगाची माफी मागितली. तो म्हणाला होता- "मला खूप लाज वाटत आहे." एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की- "मला खूप राग आला आहे आणि माझ्या मुलाच्या कृत्याची लाज वाटतेय." जॅकी चॅनचा मुलगा जेसीला ड्रग प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणाच्या संदर्भात, जेसीने न्यायालयाला आश्वासन दिले होते की, जेव्हा तो शिक्षा पूर्ण करुन बाहेर येईल, तेव्हा तो एक आदर्श व्यक्ती म्हणून एक आदर्श निर्माण करेल.
आर्यन खान प्रकरणानंतर जॅकी चॅनच्या मुलाचे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. जवळजवळ अशाच घटनांमध्ये, लोक दोन अभिनेत्यांची तुलना करून शाहरुख-गौरीचे संगोपन सदोष असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत संपूर्ण प्रकरणात शाहरुखकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पण बॉलिवूडच्या बहुतेक बड्या स्टार्सनी आर्यन खानचा बचाव केला आहे आणि त्याला निर्दोष देखील म्हटले आहे. अभिनेत्री कंगना रनौतने जॅकी चॅनच्या मुलाशी संबंधित प्रकरण इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. कंगनाने या दोन सारख्या प्रकरणांमध्ये दिग्गज कलाकारांच्या भूमिका कशा वेगळ्या दिसतात हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटो कार्डमध्ये वरील गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. तरीही त्यात आणखी एक गोष्ट होती. जॅकी चॅनचे म्हणणे असे होते की त्यांनी मुलाच्या चुकीसाठी त्याच्या संगोपनाला जबाबदार मानले. कंगनाने शेअर केलेली पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता.
कंगनाने यापूर्वी क्रूज ड्रग प्रकरणात आर्यन खानचा बचाव करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सनाही लक्ष्य केले होते. हृतिक रोशनची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर कंगनाने एका सामाजिक पोस्टमध्ये म्हटले - "आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी येत आहेत.''