मुंबई : गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आहे. रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकंच पसंत करत आहेत.


शनाया आणि राधिकाच्या हातमिळवणीची खबर गुरूला लागल्यामुळे त्यांची युती तुटली. आता शनायाला गुरु आणि राधिका दोन्हीकडून आर्थिक आधार नाहीये. त्यामुळे ती आधीपासून तिला मार्गदर्शन करणाऱ्या एफ.जी.पी.ला तातडीने इकडे बोलवून घेते. सगळ्यांना सुरुवातीपासूनच हा किंवा ही एफ.जी.पी. कोण आहे याची उत्सुकता लागली होती, पण ही एफ.जी.पी दुसरी तिसरी कोणी नसून शनायाची आई आहे आणि ती भूमिका अभिनेत्री किशोरी आंबिये निभावत आहे.


नुकतीच मालिकेत एफ.जी.पी ची एंट्री झाली आहे आणि आता ही एफ.जी.पी शनायासारखीच राधिकाची वाट लावायच्या उद्देशाने आली आहे. पण ती राधिकाचं काही वाकडं करू शकेल का? हे पाहणं जास्त रंजक ठरेल.