मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते अजय-अनिरुद्ध,आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'श्यामची आई' हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.


'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शार्व गाडगीळ,संदीप पाठक, सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. 


आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'श्यामची आई' या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.


निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं 'श्यामची आई'चं दिग्दर्शन केलं आहे. 'श्यामची आई' ही साने गुरुजींची कथा असल्यानं यात त्यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं.