मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाला अपयशाचा सामना करावा लागला. ज्यानंतर संघातील काही खेळाडूंवर निशाणाही साधला गेला. यामध्ये एक नाव होतं, ते म्हणजे संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाजाची मधली फळी सांभाळणारा खेळाडू महेंद्रसिंह धोनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीवर उठणारी टीकेची झोड आणि  त्याच्या निवृत्तीच्या एकंदर चर्चा पाहता आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्विट करत त्याच्या निवृत्तीच्या चर्चा का होत आहेत, असा सवाल केला आहे. 'महेंद्रसिंह धोनी हा मधल्या फळीचा फलंदाज आणि तितकाच चांगला यष्टीरक्षक आणि विश्वासार्ह खेळाडू आहे. धोनीची या खेळाप्रती असणारी समज संघासाठी फायद्याची असल्याची बाब खुद्द विराटलाही मान्य आहे', असं म्हणत धोनीमध्ये अद्यापही खूप सारं क्रिकेट शिल्लक आहे, ही बाब स्पष्ट करत येत्या काळातही त्याच्याकडून अफलातून खेळाची अपेक्षा करणं वावगं ठरणार नाही, असं अख्तर यांनी स्पष्ट केलं. 


धोनीच्या खेळावर असणारा विश्वास व्यक्त करत अशा परिस्थितीत त्याच्या निवृत्तीच्या चर्चा करण्याची गरजच काय आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायम खुलेपणाने मतप्रदर्शन करणाऱ्या अख्तर यांच्या या भूमिकेला अनेकांनीच दाद दिली. फक्त अख्तरच नव्हे, तर यापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगोशकर यांनीही धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चांवर मतप्रदर्शन केलं होतं. 



काय म्हणाल्या होत्या लतादीदी? 


'धोनी.... गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्या निवृत्तीच्या चर्चा ऐकत आहे. तुम्ही असं काही करु नये अशी मी विनंती करते. या देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. मी विनंती करते की निवृत्तीचा विचारही तुमच्या मनात आणू नका', असं लतादीदी ट्विट करत म्हणाल्या होत्या.