`आदिपुरुष`चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका
Petition Against Adipurush In High Court: `आदिपुरुष` चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाची मांडणी, संवाद आणि एकंदरितच पात्रांच्या लूकवरुन टीका होताना दिसत आहे. एकीकडे ही टीका सुरु असतानाच दुसरीकडे हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं आहे.
Petition Against Adipurush In High Court: हिंदू सेनेनं (Hindu Sena) दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाविरोधात रिट याचिका दाखल केली आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन सार्वजनिक पद्धतीने केलं जाऊ नये अशी मागणी हिंदू सेनेनं या याचिकेद्वारे केली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दिल्ली हायकोर्टात 'आदिपुरुष'विरोधात शुक्रवारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देत त्यावर या चित्रपटाचे शो चित्रपटगृहांमध्ये सुरु राहणार की बंद होणार हे ठरणार आहे.
माहिती योग्य पद्धतीने मांडावी
"भारतीय संविधानामधील कलम 226 नुसार जनतहितार्थ ही याचिका दाखल करत आहे की धार्मिक दुष्या महत्त्वाच्या व्यक्ती/ नेते / लोकांबद्दल चुकीची माहिती पसरवणारी वादग्रस्त दृष्य वगळण्यात यावीत. न्यायालयाने आदिपुरुष हा चित्रपट सार्वजनिकरित्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्देश द्यावेत. या प्रकरणातील खरी माहिती आणि फॅक्ट्स हे योग्य पद्धतीने मांडण्यासंदर्भातील निर्देश कोर्टाने द्यावेत," अशी मागणी या याचिकेमध्ये गुप्ता यांनी केली आहे.
भावना दुखावल्या
'आदिपुरुष' चित्रपटामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचंही गुप्ता यांनी या याचिकेमध्ये म्हटलं आहे. अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने धार्मिक व्यक्ती/नेते/पात्रांची मांडणी या चित्रपटात करण्यात आल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. "ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटामुळे हिंदू समाजाच्या भावाना दुखावल्या जात आहेत. धार्मिक व्यक्ती/पात्र/नेत्यांची चुकीची आणि अयोग्य मांडणी यात करण्यात आळी आहे. वाल्मीकी ऋषी आणि संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायणामधील व्यक्तींची अगदीच चुकीच्या पद्धतीने मांडणी या चित्रपटात केली गेली आहे," असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> "मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान
मूळ रामायणापेक्षा विरोधी पात्र
'आदिपुरुष'मध्ये भगवान श्रीराम, रावण, सिता माता आणि हुमानाची पात्रही मूळ रामायणामध्ये दाखवण्यात आलेल्या पात्रांशी विरोधाभास असणारी असल्याचा दावाही याचिकाकर्ते गुप्ता यांनी केली आहे. 'आदिपुरुष'विरोधात कोर्टात येऊन दाद मागण्यास असमर्थ असलेल्या आणि या चित्रपटामुळे भावना दुखावलेल्या व्यक्तींच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात येत असल्याचा उल्लेखही या याचिकेत आहे. या प्रकरणामध्ये 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच निर्मात्यांनी कोर्टासमोरही आपलं म्हणणं अद्याप मांडलेलं नाही.
वाद अन् तुफान प्रतिसाद
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये प्रभू रामांची भूमिका प्रभासने साकारली आहे. क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत असून सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील संवादांवरुनही चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र दुसरीकडे या चित्रपटामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरामध्ये या चित्रपटाने तब्बल 140 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.