मुंबई : 'ऑल इज वेल' असा मंत्र देत मैत्री, प्रेम, नाती आणि करिअरकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे '३ इडियट्स'. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास दहा वर्षे उलटली आहेत. पण, तरीही चित्रपटाची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे काही विक्रम मोडले, त्याचप्रमाणे चित्रीकरण झालेल्या लडाख येथेही या चित्रपटाचे परिणाम पाहायला मिळाले. 


लडाखच्या पर्यटन क्षेत्राला '३ इडियट्स'मुळे मोठा फायदा झाला असून, या चित्रपटामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढली असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत येणाऱ्या '३ इडियट्स'मुळे पर्यटक आणि मुख्यत्वे बाईकर्सची पंढरी असणारं एक सुरेख ठिकाण प्रेक्षकांना आणखी जवळून पाहता आलं. फिरस्तीच्या वाटांवर निघालेल्या प्रत्येकाच्याच मनात लडाखसाठी एक खास आणि आपुलकीचं स्थान आहे. अशा परिस्थितीत लडाखच्या काही प्रमुख ठिकाणांवर राजकुमार हिरानी यांच्या '३ इडियट्स' या चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यामुळे हे ठिकाण आता चित्रपटाच्याही नावांनी ओळखलं जातं.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाच्या अनेक किमया प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी जणू या ठिकाणी आल्यावर मिळते. शिवाय 'रँछो' आणि त्याच्या मित्रांप्रमाणेच काही क्षणांचा अगदी मनमुराद आनंदही घेता येतो. इकतच नव्हे तर, करीनाने चित्रपटाच्या अखेरच्या दृश्यात चालवलेली ती स्कूटरही येथे पर्यटकांच्या भेटीसाठी उभी आहे. त्यामुळे या 'इडियट्स'ची जादू लडाखच्या त्या नयनरम्य वातावरणात कायम आहे, हे खरं. 


चित्रपटातील काही गोष्टी, ज्या या प्रेक्षणीय स्थळाची शोभा आणि महत्त्व वाढवत आहेत त्यांची योग्य ती देखरेखही करण्यात येत आहे. 'एशियन एज'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दरवर्षी या भागात (लडाखमध्ये) हॉटेल व्यवसाय सुरू करण्य़ासाठी अनेक अर्ज आमच्याकडे येतात. त्यातीत जास्तीत जास्त अर्जाना परवानगीही देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये येथील हॉटेलांची कार्यपद्धती ही जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही कशी असेल यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहिती जम्मू- काश्मीर पर्यटन मंडळाच्या सचिवपदी असणाऱ्या Rigzen Samphel यांनी दिली. त्यामुळे प्रदर्शनानंतर दहा वर्षांनीही लडाखला आणि तेथील पर्यटनाला '३ इडियट्स'चा फायदा होत आहे, हे खरं.