नवी दिल्ली : 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातून भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम सोशल मीडियावर नेहमीच तिची मतं मांडत असते. परंतु आता जायरा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेनंतर डॉक्टरांना पाठिंबा देताना दिसत आहे. डॉक्टरांच्या समर्थनार्थ जायराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वृत्तीला विरोध दर्शवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमधील सेठ सुखलाल कर्णी मेमोरियल (एसएसकेएम) रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर आता सर्व डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या घटनेनंतर जवळपास २०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे तर ज्यूनियर डॉक्टर संपावर गेले आहेत. हा संपाचा चौथा दिवस आहे. त्यावर जायराने एक पोस्ट लिहिली आहे.


'पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांविरोधात सुरु असलेली हिंसा अतिशय दुर्देवी आणि त्रासदायक आहे. सर्वात दुर्दैवी म्हणजे ही गोष्ट अद्याप का सोडवली जात नाही. हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. माध्यमे या घटना का कव्हर करत नाही? पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्लांनंतर ३०० डॉक्टरांनी आपल्या कर्तव्याचा राजीनामा दिला आहे. ही स्थिती आपल्या राष्ट्रासाठी योग्य नाही' अशाप्रकारे तिने पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे.



दरम्यान, पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संपानंतर आज देशभरात रुग्णालयातील डॉक्टरांचा संप सुरु आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, मुंबई या ठिकाणी डॉक्टर्स पश्चिम बंगालमधील घटनेवर आवाज उठवण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्लीतील एम्ससह १८ हून अधिक रुग्णालयातील जवळपास १० हजार डॉक्टरांनी संपाची घोषणा केली आहे. डॉक्टर्स असोसिएशनकडून पश्चिम बंगाल सरकारला संपावर असलेल्या डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ४८ तासांचे अल्टिमेटम देण्यात आल्याचे सांगितले आहे. 



जायरा वसीम लवकरच प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तरसोबत 'द स्काय इज पिंक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जायरा चित्रपटात प्रियंकाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.