‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग, व्हिडीओ व्हायरल
आता देवमाणूस फेम अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे.
Devmanus Actress Aishwarya Nagesh ipl host : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये ‘देवमाणूस’ या मालिकेचा समावेश होतो. या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेड लावलं. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. ‘देवमाणूस २’ने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. देवमाणूस या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाडला घराघरात प्रसिद्धी मिळाली. किरण गायकवाडसोबत अस्मिता देशमुख, नेहा खान, माधुरी पवार, विरल माने, रुक्मिनी सुतार, ऐश्वर्या नागेश हे कलाकारही लोकप्रिय झाले. आता देवमाणूस फेम अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे.
सध्या आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. त्यातच एका मराठी अभिनेत्रीचा आयपीएलचं अँकरिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या प्रकाश नागेश आहे. तिने स्वत: एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
ऐश्वर्या नागेशची इन्स्टाग्राम पोस्ट
अभिनेत्री ऐश्वर्या प्रकाश नागेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती आयपीएलचे अँकरिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने तिचा अनुभवही शेअर केला आहे. "26 मार्च 2023...आयपीएलसाठी अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण आणि उत्साह घेऊन मी स्टुडिओत पोहोचले. सिद्धेश लाड आणि अतुल बेदाडे हे या शोमध्ये गेस्ट होते. अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला आणि शिकायला मिळाल्या. तसेच अनेक तांत्रिक गोष्टीदेखील समजून घेता आल्या. आता नवीन येणाऱ्या शूटसाठी मी उत्सुक आहे, असे कॅप्शन ऐश्वर्याने दिले आहे.
दरम्यान ऐश्वर्या ही सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं मराठीतून अँकरिंग करताना दिसत आहे. तिने 'देवमाणूस' या मालिकेत अपर्णा ही भूमिका साकारली होती. अनेक स्त्रियांप्रमाणेच अपर्णालाही फसवून डॉक्टर तिचा शेवट करतो, असे यात दाखवण्यात आले होते. या मालिकेतील ऐश्वर्याचे पात्र अगदीच लहान असेल तरी ते प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. यामुळेच ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने अनेक सौंदर्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. ऐश्वर्याने न्यूज चॅनेलचं अँकरिंगही केलं आहे.